Saturday, September 21, 2024
Homeनगरखोकरच्या मासिक बैठकीमधील बाचाबाची पोलीस ठाण्यापर्यंत

खोकरच्या मासिक बैठकीमधील बाचाबाची पोलीस ठाण्यापर्यंत

सदस्य व सदस्यपतींतील वाद वाढला || तालुका पोलिसांत परस्परविरोधी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

भोकर |वार्ताहर| Bhokar

- Advertisement -

तालुक्यातील खोकर येथे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून झालेल्या ग्रामसचिवालयाचे लोकार्पण झाल्यानंतर जुन्या ग्रामपंचायत इमारतीत पोलीस पाटील यांना एक खोली उपलब्ध करून दिल्याने काहींनी रोष व्यक्त केला. नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे वास्तुपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने व याच कार्यालयावर दुसरा मजला बांधण्यास विरोधाच्या निमित्ताने सुरू झालेला ग्रामपंचायत सदस्य व सदस्य पतींमधील वाद अखेर पोलिसांत गेला. याप्रकरणी तालुका पोलिसांत परस्पर विरोधी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

खोकर ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक व सदस्य राजू चक्रनारायण हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. येथे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून ग्रामसचिवालय उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन लोकसभा निवडणुकीपुर्वीच खासदार पुत्राच्या हस्ते झाले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी याच इमारतीचे लोकार्पण, प्रवेश तसेच दुसरा मजला बांधण्यासाठीचे भुमिपूजन संपन्न झाले. अन् येथेच माशी शिंकली. हा कार्यक्रम होऊ नये, म्हणून येथील बहुमतात असलेल्या विरोधी सदस्यांनी मोठा आटापिटा केला. आपल्याच गटाचे नेते या सोहळ्यात येणार असल्याचे समजल्यानंतर पत्रकबाजी बरोबरच या लोकनेत्यांना कार्यक्रमास न येण्याची विनंती करण्यात आली. परंतु सामाजिक बांधीलकीची जाण असणार्‍या लोकनेत्यांनी ही विनंती धुडकावत सर्वांनी चांगल्या कामाचे कौतुक केले पाहिजे, यातच गावचा विकास असतो, पण काहींच्या डोक्यात उलटा खटका असतो.

त्यामुळे असे प्रकार होतात, असा टोमणा लगावल्याचे सर्वश्रृत आहे. त्यानंतर दि. 22 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य पती गणेश सलालकर व महेश पटारे यांच्यात व सदस्य राजू चक्रनारायण यांच्या चर्चेतून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर धावून जाण्यापर्यंत गेले. त्यामुळे राजू चक्रनारायण यांनी दि.24 ऑगस्ट रोजी तालुका पोलिसांत गणेश नामदेव सलालकर व महेश भागवत पटारे या दोन महिला सदस्यपती यांच्याविरूद्ध मासिक बैठक सुरू असताना, मी गावातील अडीअडचणी मांडत असताना वरील दोघांनी अर्वाच्च भाषेत बोलून अपमानीत केले. र्तुझ्या काय बापाची ग्रामपंचायत आहे काय? ’अशी भाषा वापरून तु कोण लागून गेलास असे बोलून दमबाजी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

तर गणेश नामदेव सलालकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि.26 ऑगस्ट रोजी राजू चक्रनारायण यांनी फिर्यादी गणेश सलालकर व त्यांचा मित्र महेश भागवत पटारे यांना पाहून ‘तुम्ही कितीही अर्ज द्या, तुम्हाला काय करायचे ते करा, माहितीच्या अधिकारात माहिती देणार नाही. ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे, असे बोलून अंगावर धावून आला. तसेच शिवीगाळ केली व माझ्या नादी लागला तर जीवे मारील अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे, याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जून बाबर करत आहेत.

प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीतील चर्चेत केवळ सदस्यांनी सहभाग नोंदवायचा असतो. उर्वरीत सदस्यपती अथवा ग्रामस्थ यांनी बैठकीस बसण्यास आमचा कुठलाच विरोध नाही. आमचा मनाचा मोठेपणा म्हणून आम्ही सदस्यपतींना मासिक बैठकीत बसण्यास कधीच विरोध करत नाही. शिवाय त्यांनी चर्चेत सहभागी व्हायचे नसते, तरी आम्ही कधीही विरोध केला नाही, असे राजू चक्रनारायण यांनी सांगितले. या ग्रामपंचायतीने यापुर्वीच नवीन इमारतीत ग्रामपंचायत कार्यालय गेल्यानंतर पोलीस पाटील यांना एक व महिला बचत गटाला एक खोली देण्याचा विषय ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत झालेला आहे. त्यानुसार एक खोली पोलीस पाटील यांना देण्यात आली व एक खोली आनंदी महिला बचत गटाला दिली. अन् या वादाची सुरूवात झाली. यास काहींचा विरोध होता.

परंतु दि.17 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णयानुसार अतिरीक्त कक्षापैकी एक कक्ष पोलीस पाटील अन्य शासकीय कर्मचार्‍यांच्या कार्यालयीन वापरासाठी तसेच व दि.30 जानेवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार कागदपत्रांची देवाण घेवाण करणे सुलभ होण्यासाठी सदर आराखड्यात जनसुविधाकेंद्र तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, सभागृह मिटींगसाठी वापरण्याच्या सुचना आहेत. त्यानुसार खोकर ग्रामपंचायतीने दि. 17 मार्च 2021 रोजीच्या मासिक बैठकीत ऐनवेळेच्या विषयातील ठराव क्र.7/12 नुसार पोलीस पाटील यांना खोली देण्याचा ठराव संमत करण्यात आला. त्यास सूचक राजू चक्रनारायण हे आहेत. तर अनुमोदन नसिमा ताजखाँ पठाण यांनी दिले आहे. तर दि.28 मार्च 2023 च्या मासिक बैठकीत ठराव क्र.5/1 नुसार पुन्हा पोलीस पाटील यांना कार्यालयासाठी खोली देण्याचा ठराव झाला.

हा ठराव राजू चक्रनारायण यांनी मांडला त्यास उपसरपंच दीपक काळे यांनी अनुमोदन दिलेले आहे. तसेच येथील आनंदी ग्राम बचत गटाच्या प्रमुख ग्रामपंचायतीच्या सदस्या दुर्गावती पटारे यांच्या आनंदी बचत गटाला एक खोली देण्याचा ठराव मासीक बैठकीत झालेला आहे, हा ठराव उपसरपंच दीपक काळे यांनी मांडला. त्यास राजू चक्रनारायण यांनी अनुमोदन दिलेले आहे. खोकर गावासाठी स्वतंत्र तलाठी नेमणूक नसल्याने वडाळामहादेव सजाअंतर्गत खोकर येत असल्याने तलाठ्यांना कार्यालयासाठी खोली उपलब्ध करून देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. शिवाय या आनंदी बचत गटाने जिल्हा परीषदेच्या शाळा खोल्यांचे बाधंकाम सुरू असल्याने ही खोली सध्या तात्पुरत्या स्वरूपात शाळकरी मुलांसाठी दिलेली आहे.त्यास कुणाचाही विरोध नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या