शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यापारी राजेशकुमार गुप्ता यांचे अपहरण व खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह एका आरोपीस नाशिक येथील गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने शिर्डीतून रविवारी अटक केली आहे. विशेष पथकांचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड व पोलीस अंमलदार भगवान जाधव, भूषण सोनवणे हे नाशिक शहरात गस्त करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील 20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी शहरातील व्यापार्यांचे अपहरण करून त्यास मध्यप्रदेशात घेऊन जाऊन 10 लाख रुपये खंडणी घेणार्या टोळीतील आरोपी गुन्हा झाल्यापासून फरार असलेला मुख्य सूत्रधार व त्यांचा साथीदार शिर्डी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून ही माहिती नाशिकच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने विशेष पथक शिर्डी येथे रवाना केले. तसेच गुप्त बातमीतील आरोपींच्या शोध घेत असताना हे आरोपी साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे आल्याची माहिती मिळाली. पथकाने शिर्डी पोलिसांच्या मदतीने नमूद गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले.
शिवा रविंद्र नेहरकर, (वय 23, रा. महाजन यांच्या घरात किरायाने, नंदनवन चौक, श्रीस्वामी समर्थ केंद्राजवळ, उत्तमनगर, सिडको, नाशिक), शुभम नानासाहेब खरात, (वय 25, रा. संतोषी माता नगर, सयोग रबर कंपनीच्या पाठिमागे, सातपूर, नाशिक) या आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस करता वर नमूद गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हा केल्यापासून फरार असल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्यांच्या पुढील तपासकामी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार शिव नेहरकर उर्फ चिक्कू हा असून तो गुप्ता यांचे दुकानात कामाला होता. शिव यानेच त्यांच्या मित्रांच्या मदतीने अपहरणाचा कट रचला होता.
ही कामगिरी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, दिलीप भोई, किशोर रोकडे, दत्ता चकोर, रवींद्र दिघे, भूषण सोनवणे, भगवान जाधव, अनिरूद्ध येवले यांनी केली.