Sunday, November 24, 2024
Homeक्राईमधक्कादायक ! हातपाय बांधून विहिरीत टाकून तरूणाचा खून

धक्कादायक ! हातपाय बांधून विहिरीत टाकून तरूणाचा खून

कोंढवड |वार्ताहर| Kondhwad

राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे विजय जाधव या आरडगाव येथील तरुणाची हातपाय बांधून मुळा नदीपात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना काल दि. 15 मे रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

मंगळवार दि. 14 मे रोजी आरडगाव येथील विजय आण्णासाहेब जाधव या तरूणाच्या नातेवाईकांना शिलेगाव येथे विजय यास मारहाण झाल्याचे समजले. त्यानंतर नातेवाईकांनी शिलेगाव येथे जाऊन विजय याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. विजय यास मारहाण करणार्‍यांच्या घरी गेले असता त्यांना तेथे मारहाण करणारे सुध्दा सापडले नसल्याने नातेवाईकांच्या चिंतेत भर पडली. काल सकाळी विजयच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात विजयची मिसींग तक्रार दाखल केली. त्यानंतर विजय यास मारहाण

करणारा शिलेगाव येथील एक तरूण करपरानदीच्या काटवनात लपून बसल्याची माहिती विजयच्या नातेवाईकांना समजली. त्यांनी त्याला पकडून आरडगाव येथे नेऊन चांगला चोप देत विचारपूस केली. परंतू तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला.
राहुरी पोलीस आरडगाव येथे तात्काळ हजर होऊन त्यांनी त्या तरूणास ताब्यात घेऊन पोलिसांचा खाक्या दाखवताच त्याने विजयचा मृतदेह शिलेगाव येथील मुळानदी पात्रातील विहिरीत असल्याची कबुली दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, विकास साळवे, रोहित पालवे, संतोष राठोड, भाऊसाहेब शिरसाठ, गणेश लिपने आदी पोलिस पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने बाजेवर ठेवून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

सदर मृतदेह हा विजय अण्णासाहेब जाधव, (वय 30 वर्षे), रा. आरडगाव, बिरोबानगर, याचा असल्याचे निष्पन्न झाल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर येथे पाठविण्यात आला. विजय जाधव याची कोणत्या कारणाने हत्या झाली, हे मात्र समजू शकले नाही. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मयत विजय जाधव याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, सहा भाऊ असा मोठा परिवार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या