मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..
आपल्या आई-बाबांबरोबर जात असताना त्यांच्या कानावर सुमधूर असे बोल आले.
हरी जय जय राम कृष्ण
हरी जय जय राम
संगीताची पकड, तालसुरातले हे बोल ऐकून मुले विचारू लागले हे काय आहे? संजय मुलांना घेऊन एका भागात आला. तिथे बरीच गर्दी होती. सर्वजण कीर्तन सेवेचा आनंद घेत होते. संजय मुलांना सांगू लागला, भगवंताशी एकरूप होऊन समाज सुधारण्याचे कार्य ज्यातून केले जाते, तो हा लोककलेचा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे कीर्तन.
‘कीर्तन’ हा शब्द संस्कृतात कृत या दहाव्या गणातल्या धातूपासून झाला आहे. या धातूचा अर्थ उच्चारणे, सांगणे असा होतो. कीर्तन ज्या स्थानावर उभे राहून करतात ते स्थान म्हणजे देवर्षी नारदांचे (कीर्तनाची) गादी. आज मी तुम्हाला या कीर्तनाबद्दलचीच माहिती देणार आहे. देवर्षी नारद यांची जयंती वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीयेला साजरी करण्यात येते. यावर्षी ती आज शनिवारी म्हणजे 6 मे 2023 ला आहे. म्हणूनच आज मुलांनो, मी तुम्हाला त्यांचा विषय असलेली लोककला म्हणजे ‘कीर्तन’ याची माहिती देणार आहे. अर्थात, ती आपल्याला प्रात्यक्षिक स्वरुपात पाहायला मिळते हे आपले अहम भाग्य.
काव्य, संगीत, अभिनय क्वचित नृत्यासह सादर करत असलेल्या एकपात्री निवेदनास ‘कीर्तन’ म्हणतात. ते सादर करतात त्यांना कीर्तनकार म्हणतात. भारतात सर्व प्रदेशात, सर्व भाषेत, सर्व संप्रदायात कीर्तन प्रकार दिसून येतो. नवविध भक्तींमधली दुसरी भक्ती म्हणून कीर्तनाकडे पाहिले जाते. श्रीमद्भागवतात त्याचे तसे वर्णनही आहे
श्रवणं, कीर्तनं, विष्णे: , स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं, वंदनं, दास्य, सख्यं, आत्मनिवेदनम् ।
कीर्तन पूर्वी प्रचार, प्रसार, लोकशिक्षण आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते.
महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वपार चालत आलेली आहे. कीर्तनाच्या पद्धतीच्या अनेक व्याख्या व संकल्पना भरत महामुनींच्या नाट्यशास्त्रातून केल्या आहेत. कीर्तनातले दोन महत्त्वाचे प्रकार म्हणजे नारदीय आणि वारकरी. नारद मुनी भारतातील आद्य कीर्तनकार आहेत, असे मानले जाते. कीर्तनास आरंभ नारद मुनींनी केला. पुढे नारद मुनींनी ते महर्षी व्यासांना शिकवले, व्यास महर्षींनी शुकास शिकवले. पुढे हळूहळू त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी ही परंपरा हळूहळू वाढत गेली. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटले आहे.
जाणे भक्तीचा जिव्हाळा
तोचि दैवाचा पुतळा ।
भक्ती जाणं नवविध
तुका म्हणे तोचि सिद्ध ॥
नवविध भक्तीचे महत्त्व सिद्ध करताना, भक्तीचा जिव्हाळा असणे आवश्यक असल्याचे संत तुकाराम महाराज आपल्याला आवर्जून सांगतात. सर्व भारतीय भाषेत होणारे कीर्तन हे हरिकीर्तन, हरिकथा करतात या नावानेही ओळखले जाते.
नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग
अशी संत नामदेवांची योग्यता होती.
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी
असे नामदेवरायांच्या आयुष्याचे ध्येय होते.
संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे पन्नास वर्षे भागवत धर्माचा प्रचार करणारे संत नामदेव हे भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून मानले जातात. संत ज्ञानेश्वर माऊली, संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, समर्थ रामदास, संत तुकाविप्र, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा याचप्रमाणे संत महदंबा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, संत कान्होपात्रा, संत सोयराबाई, संत निर्मला, संत वेणाबाई, संत बहिणाबाई या सर्व संतांनी कीर्तन परंपरा अतिशय ताकदीने पुढे आणली आहे. हीच परंपरा पुढे अनेक नामवंत कीर्तनकारांनी चालवली.
कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार असतो, संत साहित्यामुळे कीर्तन समृद्ध झालेले आहेत. कीर्तनातून संत देवाचे रूप साकार करत असतात.
देव आहे देव आहे
-हृदय मंदिरी शोधूनी पाहे
या संत जनाबाईंच्या अभंगातून देव आपल्या हृदयातच आहे ते हृदय म्हणजे मंदिर आहे, असा सुंदर दृष्टांतही आपल्याला दिसून येतो.
नारदीय कीर्तन आणि वैयक्तिक कीर्तन. नारद मुनींचे गादी असलेले आणि महर्षी व्यासांनी सुरू केलेले दोन कीर्तन प्रकार म्हणजे 1) संगीत किंवा नाट्यमय 2) गद्यात सांगितले जाणारे कीर्तन ही एक भक्ती आहे. कीर्तनाचे गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन, कथासंकीर्तन असे विविध प्रकार आहेत. भगवंताचे आणि थोर विभूतींचे गुण गायन करणारा, पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कलाप्रकार होता. नंतर वारकरी, रामदासी, राष्ट्रीय कीर्तनाचे वेगळे संप्रदाय झालेले असले तरी त्याचा मूळ गाभा कायम आहे.
कीर्तनाची मुख्य दोन अंगे असतात 1) पूर्वरंग 2) उत्तररंग. नारदीय कीर्तनात मुख्य पाच भाग असतात. सुरुवातीस नमन, पूर्वरंग, तत्त्वज्ञान व अध्यात्मिक चर्चा नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तिगीत नंतर पूर्वरंगाला साजेस एखादे कथानक व अख्यान म्हणजे उत्तररंग. शेवटी भैरवी, गायन, देवाकडे मागणी आणि आरती असते. हे सर्व कीर्तनकार एकट्यानेच करत असतो. त्याला तबला-पेटी वाजवणार्यांची साथ असते.
संत साहित्य, संस्कृत- मराठी सुभाषित, नामवंत कवींच्या अर्थपूर्ण कविता, अध्यात्मिक विषयावर निरूपण, थोडाफार पण दर्जेदार विनोद आणि भारतीय शास्त्रीय सुगम संगीत गायन, काहीवेळा नर्तन आणि विषय विवरण यांनी सजवलेला एकपात्री भक्तीचा आविष्कार म्हणजे नारदीय कीर्तन. इंग्रजी, हिंदी व उर्दू काव्यातील उद्धृते या गोष्टीसुद्धा विषयाचे विवरण करण्यासाठी योग्य संदर्भात वापरता येतात. असे नारदीय कीर्तन हे बहुरंगी व सर्वसमावेशक आहे. विविध चालींची पदे, श्लोक, आर्या दिंडी, साकी, ओवी याशिवाय पोवाडा, फटका, कटाव आणि मराठी काव्य प्रकारातील इतर अनेक दुर्मिळ वृत्ते कीर्तनात गायली जातात. इष्ट देवतेची प्रार्थना किंवा तिचे गुण वर्णन हा कीर्तनाचा विषय असून भक्तिरसाचा परिपोष करणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. येथे गीतरचना महत्त्वाची असते. 15 व्या आणि 16 व्या शतकात होऊन गेलेल्या ताळपाक्कम संगीतकारांनी रचलेली सुमारे 20,000 कीर्तने हे सुमारे तीन हजार ताम्रपटाद्वारे उपलब्ध झालेली आहेत. प्रत्येक गीताबरोबर ते कोणत्या रागात गायले जावे, हेही सूचित केले आहे. त्यातील अनेक राग आज फक्त नावांनीच परिचित आहेत, उदाहरणार्थ आबाली व कोंडा मलहाहटी, शंकराभरण, श्रीराग, ललित इत्यादी. आज प्रचलित असलेल्या रागातही ताळपाक्कम संगीतकारांनी कीर्तन रचना केलेली दिसते. पल्लवी-अनुपल्लवी आणि चरण असे एका गीताचे तीन भाग या कीर्तनातूनच प्रथमच प्रचारात आले. दिव्यनाम कीर्तन हा कीर्तनाचा एक विशेष प्रकार. त्यात फक्त पल्लवी आणि चरण असे दोन गीत आढळतात. हे सर्व चरण एकाच चालीत गायले जातात, किंबहुना कधी कधी पल्लवी आणि चरण यांची चाल एकच असते. ‘उत्सव संप्रदाय कीर्तन’ मानसपूजा कीर्तन आणि संक्षेप रामायण कीर्तन हे कीर्तनाचे आणखीन काही प्रकार होत. अनेक कीर्तने संस्कृतमध्ये रचली गेली असली तरी तेलगू भाषेतही कीर्तनाचे प्रमाण अधिक आहे
वारकरी कीर्तनात पूर्वरंग आख्यान (उत्तररंग) असे दोन वेगळे विभाग नसतात. संतांच्या अभंगाचे गायन आणि त्यावर निरूपण अशा पद्धतीने टाळ-मृदुंगाच्या घोषात 20-25 साथीदारांसोबत वारकरी कीर्तन सादर केले जाते. वारकरी कीर्तन परंपरा खूप पुरातन आहे. मंदिरात सादर होणारे हे कीर्तन संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी चंद्रभागेच्या काठावर आणून जनसामान्यांना खुले करून एक नवी परंपरा सुरू केली. वारकरी कीर्तन ही सांस्कृतिक लोकशाहीची पायाभरणी ठरली.
कोणत्याही सप्ताहात नारदीय कीर्तन असायलाच हवे हाच विचार आजच्या निमित्ताने नक्कीच पुढे यावा. म्हणून आता मित्र-मैत्रिणींसमवेत आपल्या शहरात तुम्ही नियमित कीर्तन ऐकायला जायचे, मुलांनी संजयच्या या शब्दांना होकार देत पांडुरंग हरी वासुदेव हरी म्हणत पुढच्या कलाकाराकडे वाटचाल केली.