संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
बहिणीला त्रास देतो म्हणून एकावर चाकूने व रॉडने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. ही घटना संगमनेर शहरातील इथापे हॉस्पीटल समोरील सर्कल येथे रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दोघांसह तीन अनोळखी इसमांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर पंढरीनाथ डुबे रा. पेमगिरी येथील राहणार आहे. तो बहिणीला त्रास देतो म्हणून गणेश गडकरी, पंकज सोनवणे यांच्यासह आणखी तिघेजण अनोळखी इसम यांनी डूबे याच्याजवळ चारचाकी गाडीतून आले. दोन व तीन अनोळखी इसम गाडीतून खाली उतरले. दोन व तीन इसमांच्या हातात रॉड होता. त्यावेळी दोन नंबर इसमाने डूबे याच्या जवळ जावून तू माझ्या बहिणीला त्रास का देतो असे म्हणून इतर तीन अनोळखी इसमांनी डूबे याच्या डोक्यात, पाठीवर, उजवे डोळ्याखाली व डावे हातावरील मनगटावर जोराने मारहाण केली.
तर दोघांनी त्याच्या हातातील चाकूने डूबे याच्या डोक्यात मारले. त्यामुळे डूबे हा गंभीर जखमी झाला. त्याला औषधोपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी डूबे याच्या जबाबावरून संगमनेर शहर पोलिसांनी वरील सर्व इसमांविरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 782/2023 भारतीय दंड संहिता कलम 326, 324, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक माळी हे करत आहे.