अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
निंबळक बायपास रोडवरील साईबन परिसरात रात्रीच्या वेळी मैत्रिणीसोबत बसलेल्या युवकाला एका अनोळखी दुचाकीस्वाराने चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना समोर आली आहे. या युवकाला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे तसेच त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल असा एकूण 36 हजार 500 रूपयांचा ऐवज घेऊन संशयित पसार झाला.
दरम्यान, सदरचा प्रकार हा 27 सप्टेंबर रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास घडला असून गुन्हा रविवारी (11 ऑक्टोबर) रात्री दाखल झाला आहे. जपकर वस्ती, नेप्ती (ता. अहिल्यानगर) येथे राहणार्या 20 वर्षीय युवकाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 27 सप्टेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास निंबळक बायपास रोडवरून साईबन परिसराकडे जाणार्या कच्च्या रस्त्यालगत घडली. फिर्यादी हा त्यांच्या मैत्रिणीसोबत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या टेकडीवर बसून बोलत होते. यावेळी दुचाकीवरून एक अनोळखी इसम तेथे आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.
संशयिताने स्वतःजवळील चाकू फिर्यादीच्या गळ्याला लावून त्यांना धमकावले. त्यानंतर त्यांच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. या पाकिटात 1 हजार 500 रूपये रोख रक्कम, मूळ आधारकार्ड, बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम कार्ड आणि पॅनकार्ड होते. संशयिताने फिर्यादीचा मोबाईलही काढून घेतला. तसेच त्यांच्या मैत्रिणीकडील मोबाईलदेखील हिसकावून घेतला. त्यानंतर या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास दोघांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन संशयित तेथून निघून गेला. घटनेनंतर फिर्यादीने 11 ऑक्टोबर रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक कौटे अधिक तपास करीत आहेत.




