अंदरसूल | वार्ताहर Andarsul
येथील कोळगंगा नदीला पूर आल्याने नदीकाठावरी घरकुले वाड्या वस्तीवरील घरामध्ये व शेतात पुराच्या पाण्याने तसेच सततधार मुसळधार पावसाने अतोनात नुकसान झाले.
काल संध्याकाळी सहा वाजल्या पासून अंदरसूल, सायगाव, पांजरवाडी, धामणगाव, बोकटे, देवळाने सह कोळगंगा नदीपात्रलगत असलेल्या सर्व गावात घरांची पडझड झाली. अंदरसूल येथील कोळगंगा नदीपात्रलगत असलेल्या घरकुलांच्या मध्ये पाणी गेल्याने सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या आहेत. पहाटे चार वाजेपासून गावातील तरुण तसेच शासनाचे प्रतिनिधी यांनी त्वरित भेट देऊन बाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची आवश्यक व्यवस्था केली.
मंत्री भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, नायब तहसीलदार पंकज नेवसे, पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक व सर्व पोलीस कर्मचारी पहाटे पासून या परिसरात पोहोचले होते. दिलीप खैरे व सर्व पदाधिकारी यांनीही पाहणी केली. मंत्री छगन भुजबळ यांनीही अंदरसूल येथील सर्व बाधित घरकुलांच्या नागरिकांच्या पूर पाण्यात उतरून भेटी घेऊन त्यांना धीर देत तत्काळ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. खासदार भास्कर भगरे यांनी देखील नुकसानग्रस्त भागास भेटी देऊन पाहणी केली आहे.
अंदरसूल येथील कोळगंगा नदीपात्रलगत असलेल्या वैजापूर वेश लोकनेते विलासराव देशमुख प्रवेशव्दार कमानवेस या परिसरातील रामेश्वर मंदिर तसेच टेकेश्वर मंदिर, शनी मंदिर या सर्व गावाच्या चहु बाजूने पूर पाण्याने वेढा घातला आहे. तर पांजरवाडी जवळील गवळी वस्तीवरील घरामध्ये पाणी गेल्याने तेथील शेतकरी कुटुंबाला परिसरातील युवा कार्यकर्ते व शासकीय यंत्रणेचे कर्मचारी यांनी सुरक्षित ठिकाणी नेण्याची आवश्यक व्यवस्था केली. अंदरसूल गावातील बाधित कुटुंबांना राममंदिर येथे हलविण्यात आले आहे. कोळगंगा नदी व लेंडी नाला नदी या दोन्ही बाजूने पूर पाणी आल्याने नदीने पाण्याची पातळी वाढली होती. अंदरसुलकरांना 50 वर्षानंतर महापुराने रौद्ररूप धारण केल्याचे पाहायला मिळाले.




