Friday, November 22, 2024
Homeनगरकोळगाव थडीत महसूलने खोदलेल्या नाल्या बुजवून वाळूतस्करी जोरात

कोळगाव थडीत महसूलने खोदलेल्या नाल्या बुजवून वाळूतस्करी जोरात

कोळपेवाडी |प्रतिनिधी| Kolpewadi

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी गोदावरी नदी पात्रातून होणार्‍या अवैध वाळू तस्करीस लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने खोदलेल्या नाल्या बुजवून दंडाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत वाळू तस्करी जोरात सुरू आहे. कोळगाव थडी गोदावरी नदी पात्रात उतरण्यासाठी वाळू तस्करांनी जुने गावठाण गायरान हद्दीतील खडकीनाला बुजवून वनविभागाच्या राखीव वनामधून दोन किलोमीटर लांब, तीस फूट रुंद वृक्षसंपदा तोडून अवैध रस्ता तयार करत गोदावरी नदीपात्रातून चार महिन्याच्या कालावधीमध्ये सात हजार ब्रासपेक्षा अधिक वाळूचा अवैध उपसा करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला आहे. यापूर्वीचे महसूल अधिकारी नाल्या बुजवणार्‍याचा गोपनीय शोध घेऊन पोलीस कारवाई करत असल्याने वाळू तस्करी आटोक्यात होती.

- Advertisement -

आज तालुक्यात महसूल विभागाच्या ठोस कारवाईची गरज असताना अवैध वाळूतस्करीला प्रतिबंध करणार्‍या पथकाचे काही कर्मचारी वाळू तस्करीस प्रोत्साहन देत असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांना धमकवण्यापर्यंत वाळू तस्करांची मजल जात आहे. काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने गायरान हद्दीत अवैध वाळू साठ्यावर केलेल्या जप्तीच्या कारवाईमध्ये तडजोडीतून पंचनाम्यात वाळू साठा कमी दाखवून जप्त केलेली वाळू रात्रीच्या सुमारास डंपरने उचलण्याची परवानगी दिल्याची चर्चा परिसरात होत आहे. वरिष्ठांनी पंचनाम्याची सत्यता तपासून वेळीच कारवाई केली असती तर वाळूतस्करी पूर्णतः बंद झाली असती याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले.

महसूलचे अधिकारी अवैध वाळू तस्करीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पथक आल्याची खबर तस्करांना वेळीच मिळत असल्याने वाहने पसार होऊन पथक रिकाम्या हाताने परतल्याचा देखावा वेळोवेळी बघायला मिळतो. साठ टनांपर्यंत अवजड डंपरने वाळू वाहतूक होत असल्याने कोळगावथडी, माहेगाव-कोळपेवाडी रस्त्याची पुरती वाट लागली आहे. वाळू तस्कराच्या आपसातील कायमच्या वादामुळे गावाची शांतता धोक्यात येऊन सर्वसामान्य नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या