मुंबई | Mumbai
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे.१२ जिल्हा परिषदेच्या ७३१ तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
आज सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मिनी विधानसभा म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत कोण गुलाल उधळणार अन् कोण बाजी मारणार याचा निर्णय आज होणार आहे. यामध्ये भाजप- ७०, शिवसेना शिंदे गट- ३८, राष्ट्रवादी अजित पवार गट- ४३, काँग्रेस- २१, शिवसेना ठाकरे गट- १४, राष्ट्रवादी शरद पवार गट- ३, इतर- ११ जागांवर आघाडीवर आहेत. पहिल्या कलानूसार महायुतीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापूरमध्ये काय स्थिती?
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. ६८ पैकी ४० जागांचे निकाल हाती आले आहे. यामध्ये काँग्रेसने १२ जागांवरती विजय मिळवला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा १० जागांवरती विजय मिळवला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपने ७ जागांवर विजय मिळवला आहे. जनसुराज्यने चार जागांवर विजय मिळवला आहे. ठाकरे गटाने दोन जागांवर विजय मिळवला आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा मिळाली आहे. उचगावमध्ये सतेज पाटील आणि महाडिक गटामध्ये थेट लढत असल्याने या मतदारसंघातून कोण बाजी मारणार याकडे लक्ष होतं. मात्र, भाजपच्या नामदेव वाईंगडे यांनी विजय खेचून आणला.
ZP Election Results: जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार गटाची मुसंडी, आश्चर्यचकित करणारे निकाल
आमदार कोरेंना धक्का
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली असून आमदार विनय कोरे यांना बालेकिल्ल्यात धक्का बसल्याचे दिसत आहे. भादोले, घुणकी, सातवे जिल्हा परिषदेचे निकाल समोर आले आहेत या तिनही मतदार संघात आमदार विनय कोरे यांच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.
घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या विजयी झाल्या आहेत. तर पंचायत समिती नवे पारगाव मध्ये काँग्रेसचे भारत विरधवल पाटील यांचा विजयी झाला आहे. तर घुणकी पंचायत समिती जनसुराज्यच्या कल्याणी राजवर्धन मोहिते या विजयी झाल्या आहेत.
गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळेंची कन्या विजयी
गोकुळचे माजी चेअरमन अरूण डोंगळेंची कन्या विजयी झाल्या आहेत. त्यांनी कसबा तारळेमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या.
मुश्रीफ, घाटगे गटाच्या उमेदवारांचा विजय
कागल मध्ये जिल्हा परिषदेच्या सहाही जागांवर मुश्रीफ आणि दोन्ही घाटगे गटाच्या उमेदवारांचा विजय, तसेच पंचायत समितीच्या 11 जागांवर विजय संजय मंडलिक यांच्या वाटेला केवळ 1 पंचायत समितीची जागा
कोल्हापूर निकाल अपडेट
भाजप – ७
शिवसेना – ७
राष्ट्रवादी काँग्रेस (AP) – ११
काँग्रेस – १२
शिवसेना (उबाठा) – २
जनसुराज्य – ४
इतर – ५





