Saturday, July 27, 2024
Homeनगरकोल्हार भगवतीपूरमध्ये अतिभव्य कॅन्डल मार्च

कोल्हार भगवतीपूरमध्ये अतिभव्य कॅन्डल मार्च

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंब्यासाठी कोल्हार भगवतीपूर पुढे सरसावले. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने गावातून हजारोंच्या संख्येने विराट कॅण्डल मार्च काढला. यासोबतच काल बुधवारपासून येथे साखळी उपोषणास प्रारंभ झाला. तसेच गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय करण्यात आला.

- Advertisement -

एक मराठा… लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं… नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणत देणार नाही… घेतल्याशिवाय राहणार नाही, जय जिजाऊ… जय शिवराय, अशा विविध घोषणांच्या निनादात कोल्हार भगवतीपूर गावातून मंगळवारी रात्री 7 वाजता अतिभव्य कॅण्डल मार्च निघाला. यामध्ये युवक, वयोवृद्ध पुरुषांसमवेत महिला व लहान मुले देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. मोठ्या संख्येने निघालेला हा स्वयंस्फूर्त कॅन्डल मार्च लक्षवेधी ठरला. यावेळी छगन भुजबळ यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. हातामध्ये पेटलेल्या मशाली, मेणबत्त्या आणि मोबाईलचे टॉर्च घेऊन गावातून ही पदयात्रा पुढे मार्गक्रमण करीत राहिली. सदर कॅण्डल मार्च शेवटी ग्रामदैवत भगवतीमाता मंदिराच्या प्रांगणासमोर स्थिरावला. येथे कॅन्डल मार्चचा समारोप झाला. यावेळी दोन महिला व एका युवकाने मनोगत व्यक्त केले.

समारोप करताना अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे म्हणाले, दिवसेंदिवस मराठा आरक्षणासाठी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे बनले आहे. मराठा समाजाच्या आक्रोशाला सरकारला व राज्यकर्त्यांना सामोरे जावे लागत आहे. उद्याच्या निवडणुकीत हे लोक आपल्याला मतदान करणार नाही याचा राज्यकर्त्यांना धाक निर्माण झाला आहे म्हणून ते आंदोलनात सहभागी होऊ लागले. छगन भुजबळ, नारायण राणे, रामदास कदम यासारखे नेतेमंडळी मराठा आंदोलनाच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करून बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या नेत्यांनी भ्रष्टाचारातून पैसा कमावला ते आज बोलू लागले. मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍या नेत्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आज मराठा समाजाची बिकट अवस्था झालेली असताना या समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता हा समाज मागे हटणार नाही, असे त्यांनी सांगितले.

साखळी उपोषणास प्रारंभ

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून कोल्हार भगवतीपूरमध्ये सोमवारी एक दिवसाचा बंद पाळण्यात आला. त्यानंतर मंगळवारी रात्रीच्या सुमारास गावातून विराट कॅण्डल मार्च काढण्यात आला. बुधवारपासून कुंकूलोळ कॉम्प्लेक्सजवळ नगर-मनमाड महामार्गालगत साखळी उपोषणास सुरुवात झाली. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आणि मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहेत तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार आहे. यासोबतच गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय करण्यात आला. कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर येथील सकल मराठा समाज व ग्रामस्थ या साखळी उपोषणात सहभागी होत आहेत. त्याचबरोबर अन्य समाजाकडूनही या आंदोलनास मोठ्या स्वरूपात पाठिंबा मिळत आहे. दिवसेंदिवस कोल्हार भगवतीपूरमध्ये मराठा आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या