Wednesday, February 4, 2026
Homeनगरकोल्हार भगवतीपूरमध्ये डाळिंब चोरांचा सुळसुळाट

कोल्हार भगवतीपूरमध्ये डाळिंब चोरांचा सुळसुळाट

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

कोल्हार भगवतीपूर परिसरामध्ये सध्या डाळिंब चोर्‍या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरटे बागांमधून तयार झालेले डाळिंब वाहनांमध्ये भरून पसार होत आहेत. शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या घासावर चोरटे डल्ला मारीत आहेत. यामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. डाळिंब चोरांच्या सुळसुळाटामुळे डाळिंब उत्पादकांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

दोन दिवसांत भगवतीपूरमध्ये प्रवरानगर-पाथरे बुद्रुक रोड लगत असलेल्या पंकज राजेंद्र दळे यांच्या अडीच एकर बागातून सहा लाख रुपयांचे पाच टन डाळिंब, विलास गणपत दळे यांच्या दोन एकर बागातून तीन लाख रुपयांचे दोन ते तीन टन डाळिंब, काळा मळा शिवारातील मधुकर दादा खर्डे यांच्या तीन एकर बागातून तीन लाख रुपयांचे तीन टन डाळिंब चोरी गेले. या तीन शेतकर्‍यांचा मिळून साधारणपणे 12 लाख रुपयांचा डाळिंब शेतीमाल चोरून अज्ञात चोरटे पसार झाले. या शेतकर्‍यांनी डाळिंब चोरीबद्दल लोणी पोलीस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार दाखल केली.

YouTube video player

रात्रीच्या वेळी शेताभोवताली तसेच घरावर ड्रोन फिरतात. ड्रोनद्वारे टेहाळणी करून डाळिंब पिकावर डल्ला मारला जात असल्याचा संशय शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे. शेताजवळ बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेजवरून पाच ते सहा अज्ञात चोरटे दृष्टीपथात येत असल्याचे श्री. दळे यांनी सांगितले. नेमका परिपक्व झालेला माल हे चोरटे लंपास करत आहेत.
बिबट्याच्या भीतीने रात्रीच्या वेळी शेती पिकांची राखण करता येत नाही. त्याचाच फायदा उचलत हे चोरटे शेतीमालावर हात साफ करीत आहेत. अर्थात एकीकडे बिबट्याच्या हल्ल्याची भीती आणि दुसरीकडे डाळिंब चोरीचा फटका. पर्यायाने होणारे मोठे आर्थिक नुकसान अशा दुहेरी संकटात येथील शेतकरी सापडला आहे.

डाळिंब बागेसाठी रोप लागवडीपासून तर शेतमाल तयार होईपर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च येतो. महागडे औषध फवारणी, सेंद्रिय व रासायनिक खते, मजुरी, आणि बागाची हरप्रकारे निगा राखताना येणारा प्रचंड खर्च यामध्ये समाविष्ट आहे. अशा सर्व बाबींचा विचार केल्यास एवढा मोठा खर्च करून जतन केलेली डाळिंब बाग परिपक्व झाल्यानंतर ऐनवेळी चोरटे येऊन ती लंपास करत आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कोल्हार भगवतीपूर येथील डाळिंब उत्पादकांमध्ये याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तात्काळ या चोर्‍यांचा छडा लावून चोरट्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...