कोल्हार |वार्ताहर| Kolhar
कोल्हार बुद्रुक येथील बनकर फाटा शिवारात पत्र्याच्या शेडमधील मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात 8 मेंढ्या जागीच ठार तर 1 जखमी झाली. तसेच मेंढीचे एक छोटे पिल्लू बिबट्याने ओढून नेल्याची घटना घडली.
कोल्हार बुद्रुक येथील फिरदोस आलमभाई पठाण यांची बनकर फाटा (राजुरी रोड) येथे शेती आहे. तेथे 4-5 महिन्यांपासून त्यांनी 7-8 गुंठ्यामध्ये मेंढीपालन व्यवसाय सुरू केला. पत्र्याच्या शेडमध्ये त्यांच्या मालकीच्या 31 मेंढ्या होत्या. शेडभोवती उभे पत्रे आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने या शेडमध्ये उडी मारून आत प्रवेश केला व मेंढ्यांवर हल्ला केला. यात 8 मेंढ्या जागीच ठार झाल्या तर 1 जखमी झाली. याशिवाय एक पिल्लू बिबट्याने ओढून नेले. यातील 4 मेंढ्या गाभण होत्या. साधारणतः 60 हजार रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचे श्री. पठाण यांनी सांगितले.
काल रविवारी सकाळी साडेसहा वाजता ही घटना कळल्यानंतर त्यांनी कोपरगाव विभागाच्या वनाधिकार्यांशी संपर्क करून याबद्दल खबर दिली. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान वनपाल बी. एस. गाढे, वनरक्षक संजय साखरे, प्राणीमित्र विकास म्हस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.