Saturday, July 27, 2024
Homeनगरकोल्हारमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोघांनी उपोषण सोडले

कोल्हारमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोघांनी उपोषण सोडले

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

कोल्हार भगवतीपूर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा व मराठा महिला पुरुषांना झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ आमरण उपोषण शनिवारीही सुरू होते. उपोषणाचा कालचा तिसरा दिवस होता. आंदोलनकर्ते आमरण उपोषणावर ठाम आहेत. मात्र यातील दोघांची प्रकृती बिघडल्याने वैद्यकीय सल्ल्यामुळे त्यांना उपोषण सोडावे लागले.

- Advertisement -

कोल्हार भगवतीपूर येथील भगवतीमाता मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या आमरण उपोषणास तीन दिवस झाले. तरीदेखील प्रशासनाच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकार्‍याने समक्ष येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. याबद्दल ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी उपोषणाच्या तिसर्‍या दिवशीही उपोषणकर्ते आपल्या निर्णयावर ठाम होते. बाभळेश्वरचे मंडलाधिकारी बी. एफ. कोळगे यांनी राहाता तहसीलदारांचे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिले. यामध्ये आमरण उपोषण मागे घ्यावे ही विनंती करण्यात आली.

मात्र प्रशासनाचा कोणताही वरिष्ठ अधिकारी येथे समक्ष न आल्याने उपोषणकर्त्यांनी या पत्राची दखल घेतली नाही व आपल्या उपोषणावर ठाम राहिले. काल संध्याकाळी कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पारखे यांनी उपोषणास बसलेल्या आठ जणांची वैद्यकीय तपासणी केली. यामध्ये सुरेश भीमाशंकर पानसरे व किरण शिवाजी राऊत या दोघांना रक्तदाबाच्या तक्रारी व प्रकृती अस्वस्थ असल्याचे जाणवले. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार या दोघांनी सदर उपोषणातून माघार घेतली. मात्र उर्वरित जितेंद्र खर्डे, नितीन खर्डे, अभय खर्डे, सोमनाथ खर्डे, अमोल खर्डे, संकेत कापसे हे सहा जण आमरण उपोषणावर ठाम राहिले.

काल दुपारी काँग्रेसचे राहता तालुकाध्यक्ष अ‍ॅड. पंकज लोंढे यांनी याठिकाणी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. तसेच काँग्रेस पक्षाचा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच या उपोषणास पाठिंबा असल्याचे लेखीपत्र त्यांनी दिले. कोल्हार येथील कृषक शेतकरी गटाच्या सर्व सदस्यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या