कोल्हार |वार्ताहर| Kolhar
नगर – मनमाड महामार्गावर प्रवरा नदीच्या पुलाजवळ कोल्हार खुर्द हद्दीतील दर्गा आणि ईदगाह येथील मुस्लिम बांधवांनी स्वतः काढून घेतली. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि मुस्लिम समाज बांधव यांनी सहमतीने आणि सहकार्याने हे अतिक्रमण काढून एक उत्तम उदाहरण समोर ठेवले. त्यांच्या या सामंजस्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी राहुरी पोलिसांचा फौजफाटा हजर होता.
काही दिवसांपासून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून नगर मनमाड महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याचा धडाका सुरू आहे. कोल्हार बुद्रुकमधील व्यावसायिकांनी व ग्रामस्थांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून इतरांसमोर आदर्श ठेवला. त्याच अनुषंगाने काल मंगळवारी राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथेही हजरत शादवल बाबा आणि चांद शाहवली बाबा दर्गा तसेच ईदगाह काढण्यात आली. या विषयासंदर्भात काल मंगळवारी सकाळी राहुरी येथे तहसीलदार नामदेव पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे महेशकुमार मिश्रा, अलोककुमार सिंग, कोल्हार खुर्दच्या सरपंच अनिता शिरसाठ, प्रा. दिगंबर शिरसाठ, राजेंद्र वर्पे, कोल्हार खुर्द येथील मुस्लिम बांधव आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. परवा सोमवारी देखील यासंबंधी बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये नगर- मनमाड महामार्गावरील पुलाजवळचे हे अतिक्रमण काढून घेण्यात यावे. अन्यथा नियमानुसार ते राजमार्ग प्राधिकरणकडून काढण्यात येईल असे संबंधितांना सांगण्यात आले. सामंजस्याने व शांततेच्या मार्गाने हे अतिक्रमण निघावे अशी अपेक्षा प्रशासकीय अधिकार्यांनी व्यक्त केली. यावर कोल्हार खुर्द येथील मुस्लिम समाज बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्राधिकरणाने पुढील पाऊल उचलण्याऐवजी आम्हीच पुढाकार घेत स्वतःहून हे अतिक्रमण काढून घेतो असे सांगितले. प्राधिकरणाच्या कर्मचार्यांनी याकामी सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मंगळवारी सकाळी झालेल्या या बैठकीनंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोल्हार खुर्द येथील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत ही दर्गा काढण्यास सुरुवात केली.
मुस्लिम बांधवांनी स्वतःच्या हाताने हातोडा टाकत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने संपूर्ण दर्गा हटविण्यात आली. यावेळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अनिल गोरड, महेशकुमार मिश्रा, अलोककुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता अजिंक्य हजारे, संकेत बीचकूल व कर्मचारी जेसीबी, डंपर आदी साधन सामुग्रीसह उपस्थित होते. यावेळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सोमनाथ जायभाय, पोलीस कॉन्स्टेबल सतीश आवारे, पोलीस नाईक देविदास कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल रवी पवार आदी बंदोबस्तासाठी तैनात होते. दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांकडून या विषयासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी या विषयाबद्दल राष्ट्रीय श्रीराम संघ, एकलव्य संघटना, आरपीआय, मातंग आघाडी यांच्याकडून राहुरी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले होते. शांततेच्या मार्गाने हा विषय हाताळला गेला याबद्दल कोल्हार खुर्द ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.