Thursday, June 13, 2024
Homeनगरकोल्हारमध्ये मुलगा बुडाला त्याच जागेवर पुन्हा लगेच वाळूतस्करी सुरू

कोल्हारमध्ये मुलगा बुडाला त्याच जागेवर पुन्हा लगेच वाळूतस्करी सुरू

कोल्हार | Kolhar

- Advertisement -

नदीत बुडाल्याने कोल्हार बुद्रुक येथे शाळकरी मुलाचा अंत झाला. अवैध वाळू तस्करीतून नदीत केलेल्या खड्ड्यांमुळे त्याचा बळी गेला. बुधवारी ही घटना घडली. त्यानंतर एकच दिवस वाळूउपसा थांबला. दुसर्‍या दिवसापासून त्याच जागेवर कोल्हार खुर्दच्या बाजूने जैसे थे बेकायदेशीर वाळूतस्करी पुन्हा जोमाने सुरू झाली. गरीब मुलाचा मृत्यू झाला मात्र त्याचा काहीच फरक वाळूतस्करांना पडला नाही. त्यांचा हा विवेकशून्य निर्ढावलेपणा कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? यावर नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

दैनिक सार्वमतमध्ये शुक्रवारी कोल्हार ‘भगवतीपूरमध्ये बोकाळलेल्या वाळूतस्करीचा प्रश्न ऐरणीवर’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर कोल्हार बुद्रुक आणि कोल्हार खुर्दमधून असंख्य नागरिकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या व सार्वमतला धन्यवाद दिले. सुरू असलेल्या ताज्या वाळूतस्करीच्या व्हिडिओ क्लिप्स आमच्या स्थानिक प्रतिनिधीकडे पाठवल्या. मोकाट सुटलेल्या वाळूतस्करांना आवरण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा निर्धार गावातील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केला.

प्रवरा नदीपात्राच्या दक्षिणेकडे राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्दचा नदीकाठ आहे तर उत्तरेला कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूरचा नदीकाठ आहे. सद्यस्थितीत कोल्हार खुर्दच्या बाजूने राजरोसपणे वाळूउपसा सुरू आहे. सध्या नदीला पाणी आहे तरीही वाळू उपश्याला विश्रांती नाही. कोल्हार बुद्रुकच्या बागमळा शिवारातील वाळू बोट, केनी किंबहुना क्रेनच्या साह्याने कोल्हार खुर्दच्या बाजूला ओढली जाते. तेथून वाहनांमध्ये वाळू भरून वाहतूक सुरू आहे. वाळू ओढण्यासाठीचे मोठमोठे लांबलचक दोरखंड नदीपात्रात पसरवलेले दिसून येतात. रात्रंदिवस विनापरवाना बेसुमार वाळूउपसा केला जातो. त्यामुळे नदीत 10 ते 15 फूट खोलीचे खड्डे झाले आहेत.

याच 15 फूट खोल खड्ड्यात बुडाल्याने बुधवारी भगवतीपूर येथील शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. तेवढ्या दिवसापुरता वाळूउपसा बंद ठेवला. मात्र दुसर्‍या दिवसापासून जसे येथे काही घडलेच नाही अशा अविर्भावात वाळूतस्करी सुरू झाली. स्थानिक नागरिकांनी या निष्ठुरपणाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. कोल्हार खुर्दमधून एवढा बेसुमार वाळूउपसा व वाहतूक चालू आहे, ही गोष्ट कोल्हार खुर्दच्या तलाठ्यांना माहिती नाही का? सगळ्या गावाला ही गोष्ट माहिती असताना फक्त एकट्या तलाठ्यांनाच ही गोष्ट कशी माहिती नाही? असा प्रश्न पडतो. यावरूनच कुणाकुणाच्या संगनमताने हा डाव साधला जातो हे सर्वश्रुत आहे.

राजकीय पुढारी, महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन, स्थानिक तलाठी यांचा वरदहस्त लाभल्याने हा गोरखधंदा जोमाने सुरू आहे. अजूनही बर्‍याच लोकांचा या धंद्यात सहभाग आणि वाटा आहे. ते लवकरच उजेडात येईल. प्रत्येकाला आपापला पोटभर आर्थिक मलिदा मिळतो, त्यामुळे त्यांची राजीखुशी आहेच. वाळू तस्करीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. संबंधितांना त्यांचा वाटा पोहोच होतो. त्यामुळे ते याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. परंतु सर्वसामान्य जनतेला मात्र वाळू तस्करांसह राजकीय पुढारी आणि अधिकार्‍यांची ही मिलीभगत उघड्या डोळ्यांनी पहावी लागते.

- Advertisment -

ताज्या बातम्या