Sunday, June 7, 2026
HomeनगरAhilyanagar : कोल्हे कारखान्याची 3.87 कोटीची कररक्कम परस्पर वळविली

Ahilyanagar : कोल्हे कारखान्याची 3.87 कोटीची कररक्कम परस्पर वळविली

कर चलनांमध्ये फेरफार करुन अपहार || माजी सहाय्यक राज्यकर आयुक्तांवर गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्य वस्तू व सेवाकर विभागाच्या संगणकीय प्रणालीतील करभरणा चलनांमध्ये कथितरीत्या अनधिकृत फेरफार करून शासनाच्या तब्बल तीन कोटी 87 लाख 11 हजार 859 रुपयांच्या महसुलाला फटका दिल्याप्रकरणी तत्कालिन सहाय्यक राज्यकर आयुक्त प्रकाश लक्ष्मण चव्हाण (रा. गुलमोहर रस्ता, सावेडी) याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात शुक्रवारी (5 जून) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. राज्यकर उपआयुक्त हेमंत लक्ष्मण गांगे (वय 43) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

फिर्यादीनुसार, राज्य वस्तू व सेवाकर विभागातील करभरणा व्यवहार ‘सेल्स टॅक्स ऑटोमेशन प्रोजेक्ट’ (सॅप) या संगणकीय प्रणालीव्दारे केले जातात. व्यापार्‍यांनी भरलेल्या कराच्या चलनांवर संबंधित व्यापार्‍याचा टिन (करदाता ओळख क्रमांक) क्रमांक नोंदवलेला असतो. अशा चलनांमध्ये कोणतीही दुरूस्ती करण्यासाठी संबंधित व्यापार्‍याचा अर्ज आवश्यक असून त्यानंतरच अधिकार्‍यांना दुरूस्तीचे अधिकार असतात.

दरम्यान, या प्रकरणाची सुरूवात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांनी भरलेल्या कराच्या काही रकमा इतर व्यापार्‍यांच्या टिन क्रमांकावर वर्ग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर झाली. या प्रकरणात एक कोटी रुपये, 10 लाख रुपये, 15 लाख रुपये आणि 10 लाख रुपयेे अशा रकमा मे. हॉटेल राजश्री (श्रीगोंदा), हॉटेल सिध्दांत (शिर्डी) आणि मे. कमला एंटरप्रायजेस (नाशिक) यांच्या टिन क्रमांकांवर वर्ग झाल्याचे आढळून आले होते. याबाबत तत्कालीन राज्यकर उपायुक्त संजय शिंदे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून संबंधित रक्कम मूळ करदात्याच्या खात्यावर परत वर्ग करण्यासाठी पाठपुरावा केला होता. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असताना चव्हाण नावाच्या युजर आयडीचा वापर करून एकूण 44 करचलनांमध्ये दुरूस्ती करण्यात आल्याचे महाविकास विभाग, मुंबई यांच्या निदर्शनास आले. या 44 चलनांमधून एकूण तीन कोटी 87 लाख 11 हजार 859 रुपयांची कररक्कम मूळ व्यापार्‍यांच्या खात्यावर न जाता इतर व्यापार्‍यांच्या टिन क्रमांकावर वर्ग झाल्याचे उघड झाले.

त्यानंतर राज्यकर विभागाने अंतर्गत चौकशी सुरू केली. सहाय्यक राज्यकर आयुक्तांकडून करण्यात आलेल्या तपासणीत या 44 चलनदुरूस्तींसाठी आवश्यक असलेले व्यापार्‍यांचे अर्ज, संमतीपत्रे किंवा अन्य अधिकृत अभिलेख उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. लाभार्थी व्यापार्‍यांकडे चौकशी केली असता त्यांनीही अशा प्रकारच्या चलनदुरूस्तींसाठी कोणतीही संमती दिल्याचे दस्तऐवज सादर करू शकले नाहीत. चौकशीदरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. मे. एस. एम. देशमुख पेट्रोलियम या व्यापार्‍याने भरलेली एक लाख 30 हजार 502 रुपयांची कररक्कम मे. हॉटेल नक्ष या व्यापार्‍याच्या टिन क्रमांकावर वर्ग करण्यात आली होती. तपासात हॉटेल नक्षचे मालक अक्षय प्रकाश चव्हाण हे प्रकाश चव्हाण याचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या व्यवहारावरही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यकर सहआयुक्त कार्यालयाने 7 मे 2026 रोजी जारी केलेल्या गोपनीय पत्रानुसार, प्रकाश चव्हाण याने 15 जुलै 2017 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत अहिल्यानगर कार्यालयात कार्यरत असताना त्याच्या अधिकृत युजर आयडीचा वापर करून महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा 2002 अंतर्गत 44 चलनांमध्ये व्यापार्‍यांचे अर्ज न घेता व नियमांचे पालन न करता दुरूस्त्या केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रकाश चव्हाण याने आपल्या पदाचा गैरवापर करून, संगणकीय प्रणालीमध्ये हेतुपुरस्सर फेरफार करत शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचा अपहार केला. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि इतरांना लाभ मिळवून देण्यासाठी कररक्कम अनधिकृतपणे इतर व्यापार्‍यांच्या खात्यांवर वर्ग केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सादिल खर्च, शाळा अनुदानासाठी गुरूजींना वर्गणीचा आधार!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा परिषदेच्या शाळांना खर्च भागविण्यासाठी समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून वार्षिक अनुदान दिले जाते. पटसंख्येच्या आधारे मिळत असलेले हे अनुदान तोकडे आहे. त्यातच...