Saturday, July 27, 2024
Homeनगरसंगमनेर : कोल्हेवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी 27 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर

संगमनेर : कोल्हेवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी 27 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील कोल्हेवाडी गावासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनेकरिता 27 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या प्रयत्नांतून या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात व कोल्हेवाडीचे सरपंच दत्तात्रय खुळे यांनी दिली.

- Advertisement -

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावच्या विकासासाठी सातत्याने विविध योजना राबवल्या आहेत. संगमनेर तालुक्यात तळेगाव, निमोण, राजापूर, पानोडी, धांदरफळ यांसह अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. कोल्हेवाडी या गावची लोकसंख्या जास्त असून या गावातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत व कोल्हेवाडी येथील विविध कार्यकर्ते यांनी नामदार बाळासाहेब थोरात व इंद्रजीत थोरात आणि यशोधन कार्यालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

नामदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिमंडळात पाठपुरावा करून पुरवठा करून कोल्हेवाडी गावासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे 27 कोटी 63 लाख रुपयांचा भरीव निधी मिळाला आहे. याकामी पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांनी या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र 27 जानेवारी रोजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मुंबई येथे सुपूर्त केले. यावेळी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार हे उपस्थित होते.

या निधीमुळे कोल्हेवाडी गावात पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. हा भरीव निधी मिळाल्याबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कोल्हेवाडी गावातील विविध संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ, तरुण मंडळ, कार्यकर्ते व समस्त ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या