मुंबई | Mumbai
ड्रीम इलेव्हन आयपीएलमध्ये बुधवारी ३ वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज आणि २ वेळचा चॅम्पियन केकेआर यांच्यात सामना होणार आहे. हा सामना अबूधाबीच्या शेख झाएद मैदानावर खेळवण्यात येणार आहे .
कोलकात्याला अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्याविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर चेन्नईने मुंबई इंडिअन्सला नमवून विजयी सुरुवात केली होती. पण चेन्नईला हैद्राबाद दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्सने नमवले होते.
मात्र आपल्या अखेरच्या लढतीत पंजाबवर १० विकेट्सने विजय संपादन केल्यावर आत्मविश्वास उंचावलेला चेन्नई सुपरकिंग्ज कोलकात्याविरुद्ध आपली विजयी मोहीम कायम राखण्यासाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे कोलकाता पराभवाची मालिका खंडित करून नव्या उमेदीने मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे .
कोलकाता संघासाठी जमेची बाजू म्हणजे शुभमन गील, नितीश राणा, इऑन मॉर्गन चांगली फलंदाजी करत आहेत. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती, कमलेश नागरकोटी, शिवम मावी चांगली कामगिरी करत असून, त्यांना आपली कामगिरी अशीच कायम ठेवण्याची संधी आहे.
केदार जाधव , धोनी अद्याप चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यांना आपली कामगिरी सुधारण्याची संधी आहे. सलामीवीर शेन वॉटसन फॉर्मात परतला असून, त्याने पंजाबविरुद्ध लढतीत ताबडतोड केलेल्या फटकेबाजीमुळे संघाला १० गड्यांनी विजय मिळवून दिला होता .
या खेळीमुळे त्याने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पण संघासाठी डोकेदुखी ठरत आहे ती म्हणजे गोलंदाज विकेट्स काढण्यासाठी अजूनही संघर्ष करताना दिसून येत आहेत. त्यांना नव्या उमेदीने आणि आत्मविश्वासाने मैदानात उतरून आपल्या चुका सुधारणे गरजेचे आहे.
सलिल परांजपे, नाशिक