Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्याकोलकाता नाईट रायडर्स विजयी

कोलकाता नाईट रायडर्स विजयी

अबुधाबी । वृत्तसंस्था

युवा शुबमन गिलची फटकेबाजी आणि अनुभवी मॉर्गनने त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली आहे.

- Advertisement -

अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादवर 7 गडी राखून मात करत कोलकात्याने आपल्या विजयाचे खाते उघडले. शुबमन गिलने नाबाद 70 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मॉर्गनने नाबाद 42 धावा काढत गिलला चांगली साथ दिली.

हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 143 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवातही खराब झाली होती. सलामीवीर सुनील नरिन एकही धाव न काढता माघारी परतला. यानंतर नितीश राणा आणि गिल यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू राणाही फटकेबाजी करताना बाद झाला. कर्णधार दिनेश कार्तिकला राशिद खानने शून्यावर बाद करत कोलकात्याला तिसरा धक्का दिला.

यानंतर मैदानात आलेल्या मॉर्गनने गिलला सुंदर साथ देत अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. गिलने यादरम्यान मैदानात सुरेख फटकेबाजी करत आपले अर्धशतक साजरे केले. मधल्या षटकांत हैदराबादच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करत कोलकात्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला खरापण त्यांचे प्रयत्न फोल ठरले. हैदराबादकडून खलिल अहमद, नटराजन आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनिष पांडे यासारखे दिग्गज फलंदाज संघात असताना सनराईजर्स हैदराबादला 142 धावांवर रोखण्यात कोलकाता नाईट रायडर्सला यश आलं.

अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात येणार्‍या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या तेराव्या हंगामात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणारा वॉर्नर हा पहिलाच कर्णधार ठरला. परंतू त्याचा हा निर्णय संघाला चांगलाच महागात पडला.

बेअरस्टो आणि वॉर्नर या जोडीने डावाची सावध सुरुवात केली. कमिन्सने बेअरस्टोचा त्रिफळा उडवत कोलकात्याला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी जमलेली असतानाच वरुण चक्रवर्तीने वॉर्नरला आपल्याच गोलंदाजीवर माघारी धाडले.

यानंतर हैदराबादच्या धावगतीला अंकुश लावण्यात कोलकात्याचे गोलंदाज यशस्वी झाले. मनिष पांडे आणि वृद्धीमान साहा जोडी मैदानात तळ ठोकून उभी होती. परंतू मैदानात मोठे फटके खेळण्याची संधी त्यांना कोलकात्याच्या गोलंदाजांनी दिलीच नाही. 15 व्या षटकापर्यंत हैदराबादने 100 धावांचा टप्पाही ओलांडला नव्हता.

मनिष पांडेने एकाकी झुंझ देत अर्धशतकी खेळी केली. 38 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह त्याने 51 धावा केल्या. अखेरच्या षटकांत रसेलच्या बाउंसर चेंडूवर तो फसला आणि सोपा झेल देत माघारी परतला. यानंतर साहा आणि नबी जोडीने फटकेबाजी करत हैदराबादला 142 धावांचा टप्पा गाठून दिला. साहा अखेरच्या षटकात धावबाद झाला. कोलकात्याकडून पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या