Saturday, June 15, 2024
Homeनगरमोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या

मोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या

पुणे | प्रतिनिधी | Pune

- Advertisement -

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे याने पुण्यातील येरवडा कारागृहातील बराकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे….

याबाबत अधिक माहिती अशी की, कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे येरवडा कारागृहातील सुरक्षा क्रमांक १ मधील खोली क्रमांक १४ मध्ये शिक्षा भोगत होता. त्याने खोली क्रमांक १४ मध्ये टॉवेल फाडून कापडी पट्टीच्या सहाय्याने खोलीच्या दरवाजावरील पट्टीला बांधून सकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली. ही बाब कामावर असणाऱ्या करागृह कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. त्यानंतर त्याने तातडीने इतर सहकाऱ्यांना बोलावून घेत जितेंद्र शिंदे याला खाली उतरवले. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली असता अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान, जितेंद्र शिंदे याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसून त्याच्या मानसिक आजारावर कारागृह मनोरुग्ण तज्ज्ञ यांच्या सल्ल्याने नियमित औषधपचार सुरू होते अशी माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीमध्ये १३ जुलै २०१६ रोजी एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक केली होती. यानंतर नोव्हेंबर २०१७ मध्ये या तिन्ही आरोपींना या प्रकरणात दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा दिली होती. मात्र या विरोधात त्यांनी मुंबई खंडपीठात अपील केली होती याची सुनावणी अद्याप सुरू होती.

तसेच या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले होते. यानंतर अॅट्रॉसिटी विरोधात एकवटलेल्या सकल मराठा समाजाने राज्यभरात शांततापूर्ण विराट मोर्चे काढले होते. तर अनेक संघटनांनी आंदोलने केली होती. तर या प्रकरणातील आरोपी नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ यांच्यावर न्यायालयाच्या जुन्या इमारत परिसरात दोनदा हल्ला झाला होती. तर न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या आवारात ‘शिवबा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सशस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या