Saturday, July 27, 2024
Homeनगरकोपर्डीत तणावपूर्ण शांतता पोलीस बंदोबस्तात वाढ

कोपर्डीत तणावपूर्ण शांतता पोलीस बंदोबस्तात वाढ

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कोपर्डी घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आत्महत्या केली. दरम्यान शिंदे याच्या मृत्यूनंतर कोपर्डी गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून गावकर्‍यांनी त्याचा मृतदेह गावात आणण्यास विरोध दर्शवला आहे. यामुळे गावात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

रविवारी दिवसभर गावामध्ये तणावाचे वातावरण होते. तसेच रस्ते देखील निर्मनुष्य होते. जितेंद्र शिंदे हा मूळ कोपर्डी गावामधील असला तरी देखील मृत्यूनंतर त्याचा मृतदेह गावामध्ये आणण्यास ग्रामस्थांचा विरोध होता. याच पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी देखील जितेंद्र शिंदे यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून मृतदेह कर्जत तालुक्यामध्ये कुठेही आणू नये, यासंदर्भात सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक बळप हे स्वतः कोपर्डी गावामध्ये दिवसभर ठाण मांडून होते. त्यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा पोलीस यंत्रणा सर्व घटनाक्रम आणि परिस्थितीवर कोपर्डीसह तालुक्यामध्ये लक्ष ठेवून होते.

आंदोलन स्थगित

कोपर्डी येथे जालना घटनेचा निषेध करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी येथील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांचे गावातील मंदिरामध्ये उपोषण सुरू होते. आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता. मात्र, उपोषण करणारे आंदोलक लालासाहेब सुद्रिक यांची प्रकृती खालावल्याने शनिवारी मध्यरात्री उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाकचौरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्याशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

उर्वरित दोघांना फाशी दिल्यावर खरा न्याय

शिंदे याने फाशी घेतली हे त्याच्या कर्माचे फळ आहे. उर्वरीत दोघांनाही भर चौकात फाशीला लटकवल्यावरच माझ्या मुलीला खरा न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या