कर्जत |प्रतिनिधी| Karjat
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे ग्रामस्थांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. आज तिसर्या दिवशी देखील आंदोलन सुरू होते. आज ग्राामस्थांनी कँडलमार्च काढत शासनाचे लक्ष वेधले. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी कोपर्डी येथे येऊन आंदोलकांची भेट घेतली.
ग्रामस्थांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तिसर्या दिवशी आंदोलन सुरू होते. या आंदोलनाकडे व मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कोपर्डी ग्रामस्थांनी गावामधून कॅण्डल मार्च काढला यामध्ये गावातील सर्व लहान मुले ,विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक सहभागी झाले होते यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.यावेळी पाऊस पडत होता तरी देखील आमदार रोहित पवार आंदोलकांच्या समवेत भर पावसामध्ये बसून राहत चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत राजेंद्र गुंड, श्याम कानगुडे, सुनील शेलार, विजय मोढळे , रघुनाथ काळदाते,स्वप्निल तनपुरे, गणेश जंजिरे यांच्यासह काही पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, आज केवळ मराठा समाज नाही तर धनगर, लिंगायत ,यासह अनेक जाती धर्माचे गोरगरीब नागरिक आरक्षण मागत आहेत. कोणाचेही आरक्षण कमी न करता किंवा काढून न घेता केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनामध्ये ज्यांनी ज्यांनी आरक्षणाची मागणी केली आहे, त्यांच्यासाठी संसदेत विशेष कायदा करून त्यांना सर्वांना आरक्षण द्या म्हणजे आरक्षणाचा प्रश्न संपेल. मात्र हे करताना आरक्षण देण्याबाबत मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नका, असेही पवार म्हणाले.
फडणवीसांनी राजीनामा द्यावा
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर जो लाठी चार्ज करण्यात आला. त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागून आपणच या घटनेला जबाबदार आहोत याची नैतिक जबाबदारी घेऊन आपल्या मंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.