Sunday, September 6, 2026
HomeनगरKopargaon : कोपरगावात विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त

Kopargaon : कोपरगावात विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त

12 लाख 69 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

- Advertisement -

कोपरगाव शहरात विनापरवाना बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक करणार्‍या एका ट्रॅक्टरवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 ब्रास वाळू आणि ट्रॅक्टरसह एकूण 6 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई गोदावरी नदीपात्रात सुरेगाव शिवारात झाली असून पोलिसांना पाहून ट्रॅक्टर चालकाने पळ काढला. सदरचा ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केला असून ट्रॅक्टर वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून त्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. त्यामुळे रस्ते खराब होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचबरोबर आता कोपरगाव तालुका पोलीस आणि शिर्डी पोलिसांच्या पथकाने वाळू तस्करांविरुद्ध कारवाया केल्या. मात्र सध्या स्थितीत कोपरगावच्या महसूल प्रशासनाचे वाळू तस्करांवर दुर्लक्ष का? महसूलच्या अधिकार्‍यांना वाळू तस्करांचा मलिदा पोहोचतो का? त्यामुळे महसूलचे अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 29 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे पोलीस ठाण्याकडे येत असताना त्यांना पोलीस वसाहतीच्या पाठीमागील पावर हाऊस जवळून एक संशयास्पद ट्रॅक्टर जाताना दिसला. सदर निळ्या रंगाचा ट्रॅक्टर विना नंबर ट्रॅक्टर हा निळ्या रंगाच्या ट्रॉलीसह वाळूने भरून चालला होता. एपीआय सुंदरडे यांनी चालकाला थांबवून त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव वनराज संतु माळी, रा. औद्योगिक वसाहत, शिंगणापूर, ता. कोपरगाव असे सांगितले. ट्रॅक्टरमधील वाळूबाबत वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती त्याच्याकडे मिळून आली नाही. चोरून आणल्याची कबुली चालकाने दिली. या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद सोनवणे व त्यांच्या सहकार्‍यांनी पंचांसमक्ष पंचनामा करून कायदेशीर कारवाई केली आहे. कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून ट्रॅक्टरचे सहाय्याने वाहतूक केली जात असल्याचे गस्तीवर असलेल्या शिर्डी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस नदीपात्रात गेले असता पोलिसांची चाहूल लागतात ट्रॅक्टर चालक पसार झाला. पोलिसांनी वाळूसह ट्रॅक्टर असा एकूण सहा लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शिर्डी पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल विकी विजय त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

Raj Thackeray : महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको, GDP च्या दाव्यावरही...

0
ठाणे | Thane महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज (रविवारी) ठाण्यात (Thane) पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या...