कोपरगाव (प्रतिनिधी)
स्कुटीवरून जाणाऱ्या महिलांना धक्का देऊन पाडणे आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा करणे, अशाप्रकारे कोपरगाव व संगमनेर परिसरात दहशत माजवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांना गजाआड केले आहे.
४ सप्टेंबर २०२६ रोजी कोपरगाव येथील धारणगाव रोडच्या रहिवासी निलम अजितकुमार नय्यर या आपल्या मुलीसह स्कुटीवरून श्रीराम पार्क परिसरातून जात होत्या. दरम्यान, अज्ञात दोन भामट्यांनी त्यांच्या मोपेडने निलम यांच्या स्कुटीला जोरात धक्का दिला. यात माय-लेकी खाली पडल्याचा फायदा घेत भामट्यांनी मुलीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने चोरून नेले. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यातील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याचे कडक निर्देश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विकास जाधव आणि पथकाने तपास चक्रे वेगाने हलवली. ८ सप्टेंबर रोजी गुप्तहेरामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा लोणी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार दिप सातपुते याने साथीदारासह केला आहे. या माहितीच्या आधारे पथकाने लोणी परिसरात तातडीने शोधमोहीम राबवून दिप भटु सातपुते (रा. तळेगाव रोड, भिलहाट लोणी, ता. राहाता) व मयुर संजय ब्राम्हणे (रा. वेताळबाबा चौक, लोणी खुर्द, ता. राहाता) या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी कोपरगाव येथील श्रीराम पार्क आणि १० ते १२ दिवसांपूर्वी संगमनेर शहरातील एचडीएफसी बँकेसमोरून महिलांचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचे दागिने एका सोनाराला विकल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी संबंधित सोनाराकडे चौकशी केली असता, त्याने दागिन्यांची लगड बनवून मित्राकडे ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी पंचासमक्ष तब्बल ३० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड (किंमत ४ लाख ५० हजार रुपये) आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा मोपेड (क्रमांक एमएच १७ जीपी ६८६२, किंमत ६५ हजार रुपये) असा एकूण ५ लाख १५ हजार रुपांचा मुद्देमाल जप्त केला.
तपासात आरोपींकडून कोपरगाव शहर (गु.र.नं. ४८८/२०२६) आणि संगमनेर शहर (गु.र.नं. ८२२/२०२६) येथील गुन्हे उघडकीस आले आहेत. हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०९ (४), ३(५) अन्वये गुन्हे दाखल आहेत. आरोपींना पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि विकास जाधव, पोलीस अंमलदार विजय पवार, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भगवान थोरात, सुनिल मालणकर, महादेव भांड, फुरकान शेख आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली.




