कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)
हाताशी आलेल्या पिकाचे डोळ्यादेखत नुकसान झाल्याने कोपरगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील येसगाव शिवारात शुक्रवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन शेतकऱ्यांचा सुमारे तीन एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील कोल्हे वस्ती परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. या भागात डॉ. मनोज भागवत आहेर आणि रघुनाथ एकनाथ गायकवाड यांची शेती आहे. दोन्ही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उसाची लागवड केली होती. सध्या हा ऊस पूर्णपणे तयार झाला असून तोडणीला आला होता. मात्र, शुक्रवारी ९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक या उसाला आग लागली.
भरदुपारी उसाच्या फडाला आग लागल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. वाऱ्याचा वेग आणि कोरड्या पालापाचोळ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि येसगावच्या ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर कोपरगाव नगर परिषद आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक नागरिकांनी अथक परिश्रम करून ही आग आटोक्यात आणली.
अग्निशमन दलाने आग विझवली असली, तरी तोपर्यंत डॉ. मनोज आहेर यांचा सुमारे अडीच एकर ऊस आणि रघुनाथ गायकवाड यांचा सुमारे एक एकर ऊस जळून कोळसा झाला होता. आगीची तीव्रता इतकी होती की, उसाच्या उरलेल्या कांड्याही आता कोणत्याही कामाच्या राहिल्या नाहीत. या आगीत दोन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, शेतावरून गेलेल्या विद्युत तारांमध्ये जोराच्या घर्षणामुळे ठिणगी पडली आणि त्यामुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महावितरणच्या कारभारावर आणि लोंबकळणाऱ्या तारांवर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.




