Friday, November 22, 2024
Homeनगरकोल्हे अखेर विधानसभेच्या रिंगणाबाहेर; दिल्लीतील बैठकीनंतर स्पष्ट संकेत

कोल्हे अखेर विधानसभेच्या रिंगणाबाहेर; दिल्लीतील बैठकीनंतर स्पष्ट संकेत

रांजणगाव देशमुख/कोपरगाव |प्रतिनिधी| Rajangav Deshmukh | Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीअंतर्गत निर्माण झालेला पेच सोडविण्यात भाजप श्रेष्ठींना यश आले असून कोल्हे परिवारातून संभाव्य आव्हानाचे वादळ शमले आहे. त्यामुळे कोपरगावच्या लढतीतून यावेळी कोल्हे रिंगणाबाहेर असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे या माता-पुत्रांनी सोशल मीडियावर कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या पोस्टने याचे स्पष्ट संकेतही दिले आहेत.

- Advertisement -

कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे विद्यमान आमदार आहेत. यावेळीही महायुतीतून त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपात असलेले विवेक कोल्हे यांच्या निर्णयाकडे लक्ष होते. ते पक्षत्याग करतील आणि राष्ट्रवादी शरद पवार किंवा काँग्रेसकडून रिंगणात उतरतील, अशी शक्यता गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होती. मात्र आठवड्यापूर्वी या स्थितीत अचानक ट्विस्ट आला. भाजपमधून कोल्हे परिवाराची मनधरणी सुरू असल्याचे समोर आले. त्यामुळे कोल्हे काय निर्णय घेणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नंतर केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी कोल्हेंशी चर्चा करून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते.

अखेर नवी दिल्लीत मंगळवारी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कोल्हे मात-पुत्रांच्या बैठकीतून तोडगा समोर आल्याचे संकेत मिळाले. यानंतर स्नेहलता कोल्हे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ‘कधी कधी दोन पावले मागे येणे म्हणजे दहा पावले पुढे जाण्यासाठी घेतलेली भूमिका असते’ अशी भुमिका मांडल्याने त्यांना भविष्यात मोठी जबाबदारी किंवा संधी देण्याचा भाजप श्रेष्ठींनी शब्द दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. विवेक कोल्हे यांनी देखिल केंद्रीय नेतृत्वाने सकारात्मक विश्वास दिल्याचे म्हटले आहे. कोल्हे निवडणूक रिंगणातून बाहेर पडल्याचे संकेत मिळाल्यानंतर आ.आशुतोष काळे यांना कोण आव्हान देणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हे यांच्या ताज्या संकेतामुळे महाविकास आघाडीपुढे उमेदवारीचा पेच निर्माण होणार असून रिंगणात कोण उतरणार? काळेंना विधानसभा सोपी जाणार की नाही? कोल्हे माघार घेतल्याचे कार्यकर्त्यांसमोर कधी जाहीर करणार? काळेंच्या प्रचारात कोल्हे सक्रीय होणार का? महायुती म्हणून काळे-कोल्हे एकाच मंचावरून प्रचार करणार की काही वेगळा ‘मार्ग’ अवलंबणार? पक्षासाठी अपेक्षेप्रमाणे कोल्हे यांनी विद्यमान स्थितीत ‘त्याग’ केल्यानंतर पक्ष त्यांना नेमकी कोणती संधी देणार अथवा कसे पुनर्वसन करणार, असे अनेक राजकीय प्रश्न चर्चेत आले आहेत.

केवळ दुसर्‍यांदा…
सद्यस्थितीतील राजकीय संकेतानुसार कोल्हे यांनी विधानसभा निवडणूक लढविली नाही, तर पाच दशकात केवळ दुसर्‍यांदा कोल्हे कुटुंबातील सदस्य विधानसभेच्या रिंगणाबाहेर असेल. 1972 साली स्व.शंकरराव कोल्हे पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले. त्यानंतर 1985 चा अपवाद वगळता कोल्हे परिवारातील सदस्य निवडणूक रिंगणात उतरला आहे. 1985 ला दादासाहेब रोहमारे काँग्रेसकडून लढले आणि विजयी झाले होते. त्यानंतर 1990 पासून पुन्हा कोल्हे मैदानात उतरले. 2024 ची विधानसभा निवडणूक ही कोल्हे कुटुंबातील सदस्याच्या उमेदवारीशिवाय दुसरीच निवडणूक ठरणार आहे.

महायुती अंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कोल्हे कुटुंबाची दखल घेऊन सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे. आगामी काळात राजकीय ताकद देऊन स्व. शंकरराव कोल्हे यांनी जपलेला ‘सेवा हाच धर्मा’चा वारसा जोमाने पुढे नेण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने सकारात्मक विश्वास दिला आहे.
– विवेक कोल्हे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या