Monday, May 20, 2024
Homeनगरकोपरगाव मतदार संघात पावसाचा खंड

कोपरगाव मतदार संघात पावसाचा खंड

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव मतदार संघातील सर्वच मंडलात 25 दिवसापर्यंत पावसाचा खंड पडल्यामुळे त्याचा खरीप पिकांना मोठा फटका बसणार असून उत्पादनात मोठी घट होणार आहे. परिणामी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आगाऊ पिक विमा भरपाई द्यावी, अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे दिलेल्या निवेदनात केली आहे.

- Advertisement -

निवेदनात आ. काळे यांनी म्हटले आहे, तालुक्यातील सुरेगाव मंडलात 25 दिवस, कोपरगाव मंडलात 23 दिवस, रवंदा 23 दिवस, पोहेगाव 21 दिवस, दहेगाव 13 दिवस व राहाता तालुक्यातील पुणतांबा मंडलात देखील पावसाचा खंड पडला आहे. त्याचा मोठा फटका खरीप हंगामातील पिकांना बसणार असून उत्पादन जवळपास 50 टक्क्यांपेक्षा जास्त घटणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कोपरगाव तालुक्यातील 33488 शेतकर्‍यांनी 38120.47 हेक्टर क्षेत्रावर व पुणतांबा मंडलात देखील 11574 शेतकर्‍यांनी खरीप पिकांची पेरणी केलेली आहे. लहरी हवामानाचा फटका पिकांना बसून नुकसान होवू नये यासाठी एकूण 45,062 शेतकर्‍यांनी 64,023 पिक विमा अर्ज भरलेले आहे.

शासन निर्णय व पिक विम्याच्या तरतुदीनुसार खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे पूर, पावसातील खंड व दुष्काळामुळे शेतकर्‍यांच्या अपेक्षित उत्पनात घट होणार असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात 25 टक्के पर्यंत नुकसान भरपाई आगाऊ देण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार कोपरगाव मतदार संघात होणार्‍या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तातडीने आगाऊ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी ना. धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. तसेच शेतकर्‍यांना पिक विम्याची नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासाठी शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे सर्व्हे करून तात्काळ पंचनामे करावे. यासाठी कृषी-महसूल विभागाचे पथक तयार करण्यासाठी सबंधित विभागाला तातडीने सूचना कराव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे पत्राद्वारे आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या