Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डीत 20 डिसेंबरला मतदान

Ahilyanagar : कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डीत 20 डिसेंबरला मतदान

न्यायप्रविष्ट याचिकांमुळे राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यासह राज्यात पालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना शनिवारी (29 नोव्हेंबर) रात्री राज्य निवडणूक आयोगाने आदेश काढून न्यायालयात दाखल झालेल्या नगराध्यक्षासह सदस्यपदाच्या निवडणुकीला स्थगित दिली. या स्थगिती आदेशात जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या चार पालिकांच्या नगराध्यक्षपदासह संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने राबवली जाणार आहे. दरम्यान, 7 पालिकेतील 12 सदस्यपदांच्याही आरक्षण प्रकरणाचा यात समावेश असून याबाबत रविवारी (30 नोव्हेंबर) रात्री उशीरा राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन येणार असल्याची आशा जिल्हा प्रशासनला आहे. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांना अवघे 48 तास शिल्लक असतानाच निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री हा निर्णय जाहीर केला. पण सदस्य निवडणुकीबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम कायम आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांच्या 289 जागांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार होती; परंतु निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवारांविरोधात न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. यामध्ये अर्ज अवैध ठरल्यानंतर उमेदवारांनी दाखल केलेल्या दाव्यांवरती उशिरा लागलेला निकाल, अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी आणि अशा प्रक्रियेत आधीच वाटप झालेले चिन्ह, या सर्व गोष्टींमुळे राज्य निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी नगर परिषद व नगरपंचायत निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित अध्यक्ष व सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेपासून नवीन निवडणूक कार्यक्रम राबवला जाणार आहे.

YouTube video player

जिल्ह्यातील पाथर्डी, कोपरगाव व देवळाली नगरपरिषद व नेवासा नगरपंचायत या चार पालिकांच्या नगराध्यक्षसह सदस्य पदावर न्यायालयात अपील दाखल झाले होते. त्यामुळे आयोगाच्या नवीन अध्यादेशानुसार येथे निवडणूक प्रक्रिया नव्याने राबवली जाणार आहे, तसेच राहाता वगळता श्रीगोंदा, श्रीरामपूर, शिर्डी व राहुरी पालिकेतील प्रत्येकी 1, जामखेड 2 आणि शेवगाव व संगमनेर पालिकेच्या प्रत्येकी 3 सदस्य जागेची निवडणूक नवीन कार्यक्रमानुसार होणार आहे. मात्र, याबाबत स्पष्टपणे आदेश अद्याप प्राप्त नाहीत.

रविवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाने नगर जिल्हा प्रशासनासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेतली. यावेळी निवडणुका होणार्‍या पालिकांचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया हजर होते. मात्र, या बैठकीनंतर राहाता वगळून उर्वरित सात पालिकांच्या निवडणूक प्रक्रियेबाबत स्पष्ट आदेश उपलब्ध होवू शकले नाहीत, असे जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी सांगितले.

असा आहे नवीन कार्यक्रम
पुढे ढकललेल्या नगर परिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 4 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी निवडणुक कार्यक्रम जारी करणार आहेत. 10 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी मुदत, 11 डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप तसेच निवडणूक लढवणार्‍या अंतिम उमेदवाराची यादी प्रसिध्द केली जाईल. 20 डिसेंबर रोजी मतदान, तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

सात पालिकेतील 12 जागा स्थगित
श्रीरामपूर- प्रभाग 3 अ (एक जागा), श्रीगोंदा- प्रभाग 7 ब (एक जागा), राहुरी- प्रभाग 2 अ (एक जागा), संगमनेर- प्रभाग 1 ब, प्रभाग 2 ब व प्रभाग 15 ब (तीन जागा), शेवगाव- प्रभाग 1 ब, प्रभाग 5 अ, प्रभाग 12 अ (तीन जागा), शिर्डी- प्रभाग 6 अ (एक जागा), जामखेड- प्रभाग 2 ब, प्रभाग 4 ब (दोन जागा).

उमेदवार आणि समर्थकांच्या उत्साहावर पाणी
मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा आणि पाथर्डी या चार नगरपरिषदांच्या निवडणूक प्रचार भलताच रंगात आला होता. त्यातच या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्याचे वृत्त धडकताच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. याचे खापर नेते एकमेकांवर फोडत आहेत. अन्य पालिकांमध्येही काही प्रभागातील निवडणूका स्थगित झाल्या. याबाबत उमेदवार आणि समर्थक प्रशासनाशी सातत्याने संपर्क करीत होते. पण प्रशासनाकडून याबाबत स्पष्टता मिळू शकली नाही.

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...