Sunday, May 26, 2024
Homeनगरपिके सुकले, खरीप हुकले

पिके सुकले, खरीप हुकले

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगांव तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पीके शेतकर्‍यांच्या हातून गेली आहेत. पावसाळ्यात सुरु झाल्यावर जेमतेम पाऊस पडला त्यावर काही भागात शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या तर काही भागात पेरण्याच झाल्या नाहीत. पेरण्या केल्यानंतर दोन महिने झालेतरी पावसाचा थेंबही पडेनासा झाला. आज येईल, उद्या येईल या आशेवर शेतकरी होता. मात्र आता सर्व पिकांनी माना टाकल्या. तालुक्यातील सर्व पिके सुकली आणि खरीपाचे पीक हुकले आहेत.अनेक शेतकर्‍यांनी तर सुकलेल्या पिकांमध्ये जनावरे सोडली आहेत.

- Advertisement -

तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोयाबीन, मका, बाजरीची पेरणी केलेली होती. पण आता ही सर्वच पिके कोमेजून गेली आहेत. पाऊस झाला तरी पिके वाचणार नाहीत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूधधंदा आहे. मात्र चारा टंचाई आतापासूनच सुरू झाली आहे. जनावरांची संख्या जास्त असल्याने ती कशी जगवायची या विवंचनेत बळीराजा आहे. दररोज दुग्धउत्पादन घटत आहे. आसपासच्या तालुक्यातही दुष्काळी परिस्थिती असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. रांजणगाव देशमुख परिसरात काही शेतकरी तर गेल्या एक महिन्यापासून टँकरने पाणी आणून जनावरांना देत आहे.

पाटपाण्याची व्यवस्था असलेली गावे वगळता इतर गावांंमध्ये माणसांच्याही पिण्याच्या प्रश्न निर्माण होत आहे. निळवंडे धरणात पाणीसाठा चांगला आहे. कालव्यांची चाचणी घेतली आहे. त्या कालव्याद्वारे ओढेनाल्यांद्वारे पाझरतलाव, केटीवेअर भरून देणे शक्य आहे. त्यासाठी एसकेप काढून ते पाणी ओढ्यांना सहज सोडता येईल. फ्लेक्स बोर्डावरून कार्यकर्त्यांसाठी एकमेकांविरोधात दंड थोपटणार्‍या तालुक्याच्या नेत्यांनी दुष्काळातून बळीराजाला वाचविण्यासाठी खर्‍या अर्थाने आता दंड थोपटण्याची गरज आहे.

पाटपाण्याची व्यवस्था असलेल्या गावामध्येही उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे असून त्यातच समन्यायी पाणी वाटपाचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. पाउस न झाल्याने खरिपाची पीके तर गेलीच पण रब्बीची देखील आशा सोडावी लागणार आहे. राज्य शासनाने कोपरगांव तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकर्‍यांना त्याबाबतच्या सोयी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या