कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
शहरातील अवैध व्यवसाय त्वरीत बंद व्हावे. तसेच 19 सप्टेंबर 2024 रोजी शहरात झालेल्या गोळीबारातील जखमी इसमाने आमदार काळे व त्यांचे स्विय्य सहाय्यक जोशी यांचे नाव घेतले होते. त्याबद्दल सखोल चौकशी व्हावी यासाठी दत्ता काले, विजय आढाव, बबलू वाणी, विनोद राक्षे, संदीप देवकर यांनी आमरण उपोषण पुकारले होते.डिवायएसपी शिरीष वमने यांनी आंदोलकांची भेट घेऊन गोळीबार घटनेतील आरोपांची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
गांधी जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर अन्नत्याग करत मागण्या मान्य करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली. यावेळी डीवायएसपी शिरीष वमने, युवानेते विवेक कोल्हे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत मागणीनुसार गोळीबार घटनेतील आमदार व त्यांच्या स्विय्य सहाय्यकांवर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी व अवैध धंदे बंद होण्यासाठी कार्यवाही करू, असे अश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, दहशतीमुळे कोपरगाव शहराच्या बाजारपेठेवर विपरीत परिणाम होत आहे. सोने चोरीसारखे अनेक गुन्हे अलीकडच्या काळात घडले व त्याचे पुरावे असून त्याचा छडा अद्याप लागला नाही. अल्पवयीन युवक व्यसन आणि गुन्हेगारीकडे मोठ्या संख्येने वळले असून यामागे राजकीय वरदहस्ताने अवैध व्यवसाय सुरू असल्याचे समोर येत आहे. वाढती गुन्हेगारी रोखली जावी.
आपल्या शहराचे आणि तालुक्याची ही संस्कृती नाही मात्र राजकीय आश्रयामुळे असे प्रकार दिवसेंदिवस वाढीस लागले आहेत. एक गावठी कट्टा अलीकडे सापडला. विविध ठिकाणी खून, मारामार्या, दरोडे, छेडछाड असे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहेत. गोळीबार प्रकरणातील जखमी व्यक्तीने आरोप केलेल्या व्हिडिओतील नावांची चौकशी होऊन त्यांचे फोन कॉल डिटेल्स सीडीआर तपासून चौकशी व्हावी. उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्यासमोर मांडल्या. त्यावर या प्रकाराची सखोल चौकशी करू व अवैध धंदे बंद करण्यासाठी कार्यवाही करू असे आश्वस्त केल्यानंतर उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले.
या प्रकरणात असणार्या नावांची चौकशी व मोबाईल कॉल डिटेल्स तपासणी झाल्यानंतर अनेक गोष्टी समोर येतील. याच प्रकारची घटना तहसील निगडित एका अधिकार्याचा मृत्यू कोणाच्या दबावात झाला त्याही घटनेची चौकशी होण्याची अपेक्षा उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली. आंदोलनास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरपीआय व मित्र पक्ष, राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे, ज्येष्ठ नागरिक मंचाचे विजय बंब, सुधीर डागा व्यापारी महासंघ यांच्यावतीने या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यात आला. आजी माजी नगराध्यक्ष, नगसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.