Friday, May 3, 2024
Homeनगरकोपरगाव बाजार समितीत शेतकर्‍यांची लूट - देवकर

कोपरगाव बाजार समितीत शेतकर्‍यांची लूट – देवकर

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वर्तमान कांदा खरेदीत शेतकर्‍यांची व्यापारी मोठी लूट करीत असून देयके वेळेवर देत नसल्याचा आरोप शेतकरी मनेश नानासाहेब देवकर यांनी एका निवेदनाद्वारे बाजार समितीचे सभापती यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

- Advertisement -

कोपरगाव बाजार समितीने 5 ऑगष्ट 2020 रोजी खुला कांदा व डाळींब खरेदी सुरु केली होती.त्यासाठी कोपरगाव, सिन्नर, येवला, वैजापूर, निफाड आदी तालुक्यातून शेतकर्‍यांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा महसुल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गत सप्ताहात सतरा हजार क्विंटल कांदा खरेदी झाली. शेतकर्‍यांना आपली वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक राहिली नव्हती. मात्र त्यानुसार सोयी सुविधा दिल्या जात नाही, असा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

शनिवारी तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी मनेश नानासाहेब देवकर यांनी आपला कांदा बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. त्यांचा लिलाव ओमसाई ट्रेडर्सचे व्यापारी वक्ते यांनी 1173 रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी केला. वास्तविक कांदा खरेदी केल्यानंतर त्यांना चोवीस तासाच्या आत त्याचे देयक देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी ते दिले नाही. मात्र त्यांच्या गोदामात सदर कांदा खाली करताना त्यांनी सदर माल बदलला असल्याचा आरोप शेतकर्‍यांवर करून त्यांची अडवणूक केली. त्यासाठी प्रतिक्विंटल 73 रुपये कमी घ्यावे असा आग्रह सुरु केला. तरच आपण सदर कांद्याचा माल खाली करू अशी अडवणुकीची भूमिका घेतली. आपला कांदा माल लुटला गेला. तसेच कांदा पट्टीही चार दिवसांनी मिळेल, अशी अडेलतट्टूची भूमिका व्यापार्‍याने घेतल्याचा आरोप देवकर यांनी केला आहे.

दरम्यान कोपरगाव बाजार समितीत शेतकर्‍यांची पट्टीसाठी अडवणुकीची भूमिका घेतली जात असून याकडे बाजार समितीचे लक्ष नाही, असे देवकर यांचे म्हणणे आहे. कांदा खरेदी केल्यानंतर व्यापारी 8 दिवस कांदा पट्टी देत नाही. अशा व्यापार्‍यांचा परवाना कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द करावा, अशी मागणी शेतकर्‍यांच्या वतीने मनेश देवकर यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या