कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणार्या शेतकर्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नवीन कांदा मार्केट व डाळिंब मार्केट सुरु केल्यामुळे बाजार समितीची जागा अपुरी पडत असल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे 5 हेक्टर क्षेत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला द्यावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कोपरगाव बाजार समितीची उलाढाल वाढत असून शेतकर्यांचा दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रतिसादामुळे सद्यस्थितीत जागेची मोठी अडचण निर्माण झाली आहे. शेतकर्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जागेची अडचण सोडविण्यासाठी शहरातील महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या नावे असलेली गट नं. 19, 20, 21 व 24 एकून क्षेत्र 19 हेक्टर 8 आर क्षेत्रापैकी 5 हेक्टर क्षेत्र कोपरगाव बाजार समितीला मिळावे याबाबत लेखी मागणी केली आहे.
तसेच कृषी विभागाच्या अंतर्गत 2022-23 मध्ये महा डीबीटी पोर्टलद्वारे 770 शेतकर्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना निहाय मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या मंजुरीनुसार या शेतकर्यांना मिळणारे 3 कोटी 48 लाख 63 हजार रुपये अनुदान आजपर्यंत संबंधित शेतकर्यांना मिळालेले नाही. चालू खरीप हंगामात शेतकर्यांनी मोठा खर्च करून खरीप पिकांची पेरणी केली आहे. परंतु पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून शेतकरी अत्यंत अडचणीत सापडले आहेत.
त्यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजनेचे थकीत अनुदान शेतकर्यांना तातडीने मिळाले पाहिजे. याबाबत ना. धनंजय मुंडे यांच्याशी आ. काळे यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी लवकरात लवकर थकीत अनुदान शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी ग्वाही कृषी मंत्र्यांनी दिली असल्याचे आ. काळे यांनी सांगितले आहे.