कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून तालुक्यातील काही भागात काल बुधवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यासह जिल्ह्यात देखील वेधशाळेने पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. सकाळपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरणासह आकाश भरून आले होते. सकाळी सूर्यनारायणाने नुसते दर्शन दिले. त्यानंतर दिवसभर आकाशात ढगांची दाटी झाली होती.
दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरासह तालुक्यातील कोळपेवाडी, चास, मंजूर, धामोरी, बक्तरपूर, सुरेगाव, हंडेवाडी, सोनेवाडी, पोहेगाव, देर्डे कोर्हाळे, चांदेकसारे, कोकमठाण, चांदवड, जेऊर कुंभारी, डाऊच खुर्द आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्यांची मोठी धावपळ झाली.
मकाचे रचून ठेवलेले ढीग पावसाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कापडाने झाकण्यात आले. अगोदरच उशिरा सुरू झालेला मान्सून त्यात परतीच्या पावसाने मका, कापूस, कांदे, भुईमूग, बाजरी, सोयाबीन यासह खरिपाच्या इतर पिकांची नासाडी केलेली असताना आता या अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे.
यंदा परतीच्या पावसासह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने शेतातील खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेल्या मका, बाजरी व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे शेतात बरेच दिवस पाणी साचले होते. शेतात जास्त प्रमाणात ओलावा असल्याने रब्बीसाठी शेती तयार करता येत नव्हती.
त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात गवत माजले. शेतकर्यांनी शेतातील मका व बाजरी पिकाची कणसे व इतर धान्य आवरून गवताची साफसफाई करून ऊस, गहू, हरभरा, उन्हाळी मका, कांदा, भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. यामुळे रब्बीची पेरणी बर्यापैकी झाली. ही पिके तग धरून आहेत. या परिस्थितीत शेतकर्यांच्या आशा पल्लवित होत असताना ढगाळ वातावरणामुळे पिके माना टाकत आहेत.
त्यामुळे संपूर्ण वाढ होईपर्यंत हे पीक हाती लागते की नाही याची चिंता शेतकर्यांना सतावत आहे. यावर्षीच्या परतीच्या पावसामुळे खरीप पीक वाया गेल्याने शेतकर्यांच्या आशा रब्बीवर असल्या तरी ढगाळ वातावरणामुळे रोगामुळे हाती काही पडते की नाही असा प्रश्न आहे.दरवर्षी नोव्हेबर महिन्यात थंडीस सुरुवात होते व डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडते.
ही थंडी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिकांना पोषक असते. परंतु, डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा उलटला तरी अजूनही पाहिजे तशी थंडीची चाहूल दिसत नाही.
भंडारदरा धरण परिसरात पाऊस
भंडारदरा (वार्ताहर) – गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना काल (बुधवार) पहाटे व सायंकाळी 6.15 वाजता रिमझिम पाऊस पडला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. कडाक्याची थंडी सुरू असताना गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हवेत उकाडा निर्माण झालेला असताना काल पहाटे 3.30 वाजता अचानक पाऊस सुरू झाला. पाच मिनिटांत पावसाने उघडीप दिली. मात्र सायंकाळी 6.15 वाजता पुन्हा रिमझिम पाऊस सुरु झाला. 15 मिनीटे सुरु असलेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे आदिवासी जीवन पुन्हा गारठले आहे.