कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव नगरपालिकेच्या एका माजी उपनगराध्यक्षांनी विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी दुपारी शहरातील येवला नाका परिसरात घडली आहे. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला हे अद्याप समजू शकले नसून त्यांना नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आ. आशुतोष काळे यांचा जनता दरबार 7 जानेवारी रोजी तहसील कार्यालय येथे पार पडला. हा जनता दरबार आटोपून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे व आमदार आशुतोष काळे यांचे विश्वासू सहकारी कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष यांनी अज्ञात कारणामुळे शहरातील येवला नाका परिसरात स्वतःच्या गाडीत बसून विषारी पदार्थ घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
उपनगराध्यक्षांनी हे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्यांना तात्काळ कोपरगाव शहरातील मुळे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरचे माजी उपनगराध्यक्ष भाजपा कोल्हे गटाचे निष्ठावंत होते. भाजपाकडूनच त्यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. मात्र विधानसभेच्या निवडणुकीअगोदर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार, आ. आशुतोष काळे यांच्या गटात प्रवेश केला होता. या घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.