कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून तो तहसील कार्यालयात आणत असताना वाळू तस्करांनी महसूलच्या पथकावर हल्ला करुन ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना शनिवारी रात्री काळे कारखान्यासमोर माहेगाव देशमुख हद्दीत घडली. याबाबत नायब तहसिलदार प्रफुल्लीता सातपुते यांनी वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बेकायदेशीर वाळू तस्करी रोखण्यासाठी शनिवारी रात्री नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते या पथकासह सुरेगाव शिवारात गस्त घालत असताना काळे कारखान्यासमोर माहेगाव देशमुखच्या शिवारात विना नंबरचा निळा रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर व त्यास जोडलेली दोन चाकी डंपिक ट्रॉली त्यात अवैध 5 हजार रुपये किंमतीची वाळू महसूल पथकाने अडवून कारवाईसाठी तहसील कार्यालयात आणत असताना एका पांढर्या रंगाची स्विप्ट कारने महसूल विभागाची गाडी अडविली. त्या गाडीतून कैलास देवराम कोळपे, आकाश मदने, सुनील मेहरखांब व चक17सी एफ 3642 या हिरो कंपनीची एच. एफ. डीलक्स वरून तीन अनोळखी इसम येऊन ट्रॅक्टर वरील महसूल कर्मचारी संकेत पवार व योगेश सोनवणे यांना खाली ओढून लाथ्याबुक्याने मारहाण करून सदरचा ट्रॅक्टर पळवून नेला.
या घटनेबाबत नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन कैलास देवराम कोळपे, आकाश मदने, सुनील मेहरखांब यासह तीन अनोळखी इसमविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. यातील आरोपी विरुद्ध रजिस्टर क्रमांक 224/2024 भादवी कलम 395, 353, 332, 504,506, 341, 379 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3, 15, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहे.