जेऊर कुंभारी (वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभुमी दुरुस्ती व्हावी यासाठी ग्रामस्थांसह शिवसूत्र युवा प्रतिष्ठाणने वेळोवेळी मागणी करुन देखील दखल न घेतल्याने ग्रामपंचायत कर्मचार्यांसह सदस्यांना धारेवर धरताच जनतेच्या समाधानासाठी मलमपट्टी केली. केलेले कामकाज हे तात्पुरते केले असून स्माशनभुमीची सर्जरी कधी करणार, अशी विचारणा शिवसूत्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल गुरसळ यांनी केली आहे.
जेऊर कुंभारी हे लोकसंख्येच्यादृष्टीने मोठे गाव आहे. ग्रामपंचायतीची सोय सुविधा उपलब्ध करून देण्याची जवाबदारी आहे. ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येताच शिवसूत्र युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी वेळोवेळी निवेदन देऊनही प्रश्न सुटत नसल्याने आक्रमक भूमिका घेताच ग्रामपंचायतीने हालचाल सुरू केली.
स्मशानभुमीसह पिंजर्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली ती दुरुस्तीची मागणीचा जोर वाढताच ग्रामपंचायतीने जनतेच्या समाधानासाठी मलमपट्टी केली असल्याचे जनतेच्या निदर्शनास येताच प्रतिष्ठानने व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला धारेवर धरले. केलेल्या कामकाजाची माहिती देतानाही चुकीची व उडवाउडवीची उत्तरे दिली. काम कोणी केले हेच ग्रामपंचायत सांगू शकत नाही. निकृष्ट दर्जाचे काम तातडीने बंद करा अन्यथा मोठे अंदोलन उभे केले जाईल, असा इशारा देखील प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल गुरसळ यांनी दिला आहे.