अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील कोठला झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस साठवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. तोफखाना पोलिसांनी मंगळवारी (22 सप्टेंबर) सकाळी कारवाई करून सुमारे 2 हजार 700 किलो गोमांस, चार सत्तुर, पाच धारदार चाकू आणि दोन वजनकाटे, असा एकूण 5 लाख 45 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य संशयित समीर बाबुलाल कुरैशी हा पसार आहे. नुर लाल सय्यद (वय 42) आणि जगदीश ऊर्फ सोनू कमल दास (वय 36) अशी ताब्यात घेतल्यांची नावे आहेत. तिघांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील कोठला झोपडपट्टी भागातील कुरैशी नाष्टा सेंटरच्या मागे गोमांस साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तेथे कारवाई केली. यावेळी अंदाजे 2 हजार 700 किलो गोमांसाचे लहान-मोठे तुकडे आढळून आले. या प्रकरणात समीर कुरैशी हा मुख्य संशयित पसार असून त्याच्या हस्तकांपैकी नूर सय्यद आणि जगदीश उर्फ सोनू दास यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कत्तल करून मिळविलेले मांस स्वतःच्या हॉटेलसाठी तसेच इतरांना विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचा पोलिसांचा आरोप आहे. सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बालाजी वैद्य, उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली आहे.




