अहिल्यानगर (प्रतिनिधी)
केडगाव येथील साखरपुडा समारंभातून चोरीला गेलेल्या सुमारे 16 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत कोतवाली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यात जाऊन तब्बल दोन दिवस कोंबिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. विशेष म्हणजे, या कारवाईत अल्पवयीन मुलांचा वापर करून देशभरातील लग्न व साखरपुडा समारंभांना लक्ष्य करणार्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
2 मे रोजी रात्री केडगाव येथील श्रेया गार्डनमध्ये आयोजित साखरपुडा समारंभात शिक्षिका सिंधु महेश माने (वय 52, रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यांच्या कापडी पिशवीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. समारंभातील गडबडीचा आणि लाईट गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता एक अल्पवयीन मुलगा संशयित म्हणून समोर आला. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान हा प्रकार एका संघटित टोळीमार्फत घडवून आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, ही टोळी अल्पवयीन मुलांना पुढे करून देशभरातील लग्न, साखरपुडा व इतर कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये चोरी करत असल्याची माहिती समोर आली.
त्यानुसार पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्यासह विनोद बोरगे, विशाल दळवी, सूरज कदम यांचे विशेष पथक मध्यप्रदेशात रवाना झाले.राजगड जिल्ह्यातील बोटा पोलीस ठाणे हद्दीतील चार गावांमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन दिवस विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईदरम्यान उत्तरप्रदेश, दिल्ली व गोवा पोलिसांची पथकेही त्याच भागात दाखल झाली होती. कारण, या भागातील काही टोळ्या देशभरातील चोरीच्या गुन्ह्यांत सक्रिय असल्याची नोंद विविध राज्यांच्या पोलिसांकडे आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीत दिसणार्या अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांनी दाखवलेल्या पुराव्यांनंतर संबंधितांनी चोरीची कबुली दिली व चोरीतील सोन्याचे दागिने पोलिसांच्या हवाली केले.
धोकादायक भागात धाडसी मोहीम
राजगड जिल्ह्यातील बोटा पोलीस ठाणे हद्दीतील चार गावांमध्ये चोरीच्या टोळ्यांचे जाळे सक्रिय असल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. या गावांमध्ये तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ल्याच्या घटनाही पूर्वी घडल्या आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोतवाली पोलिसांनी केलेली कारवाई धाडसी मानली जात आहे. चोरी करणारा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला नोटीस देण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
सलग दुसरी मोठी कामगिरी
गेल्या आठवड्यात बसप्रवासादरम्यान चोरीला गेलेल्या नेवासा तालुक्यातील महिलेचे सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले होते. त्यानंतर आता पुन्हा 16 तोळ्यांचे दागिने हस्तगत करून पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणण्यातील आपली कार्यक्षमता सिध्द केली आहे. त्यामुळे कोतवाली पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.





