अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील बंधन लॉन येथे पार्किंगमध्ये किरकोळ वादातून एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 3 मे रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. सतीष अरविंद म्हस्के (वय 45 रा. सारस नगर, अहिल्यानगर) हे बंधन लॉन येथील पार्किंगमध्ये जनरेटर लावत असताना निखील कोरडे (रा. वैदुवाडी) याने मोटारसायकलसह जनरेटरच्या केबलवरून जाण्याचा प्रयत्न केला.
सतीश म्हस्के यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, कोरडे आणि त्याचे साथीदार बापू शिंदे व रवी सोळंके यांनी शिवीगाळ केली आणि मारहाण केली. त्याचवेळी रवी सोळंके याने कोयत्याने खांद्यावर वार केला, तर अनोळखी व्यक्तीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीत सतीश म्हस्के यांची दोन तोळ्यांची सोन्याची चेनही गहाळ झाली आहे. म्हस्के यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरून निखील कोरडे, बापू शिंदे, रवि सोळंके आणि एक अनोळखी इसम यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.