अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुणे येथील विवाह समारंभ उरकून पाथर्डी येथे घरी परत जात असताना झोप आली म्हणून केडगाव उपनगरातील हॉटेलच्या पार्किंगमध्ये कारमध्ये झोपणे व्यापारी कुटुंबाला महागात पडले. पती- पत्नीला कोयत्याने मारहाण करून चार लाख 60 हजारांचे पावणे सात तोळ्यांचे दागिने तिघांनी ओरबाडून नेले. बुधवारी (4 डिसेंबर) पहाटे चारच्या सुमारास अहिल्यानगर- पुणे महामार्गावरील कन्हैय्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली.
याप्रकरणी रितेश सुरेश पटवा (वय 37 रा. साईनाथनगर, पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांच्या शेजारी राहणार्या भंडारी कुटुंबातील लग्न सोहळ्यासाठी ते पत्नी प्रियंका, आई शोभा व मुलासह त्यांच्या कारमधून मंगळवारी (3 डिसेंबर) पुणे येथे गेले होते. लग्न सोहळा पार पडल्यानंतर रितेश, पत्नी प्रियंका, आई शोभा व मुलगा असे सर्व कारमधून घरी पाथर्डी येथे जाण्यासाठी रात्री साडेनऊच्या सुमारास निघाले होते. दरम्यान, ते बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास केडगाव शिवारात आल्याने रितेश यांना झोप येत असल्याने त्यांनी कार कन्हैय्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये घेतली व कार लॉक करून ते चौघे कारमध्ये झोपी गेले. पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या जवळ विना नंबरच्या दुचाकीवरून तिघे जण आले. त्यांच्या हातात कोयता होता. त्या तिघांनी रितेश व त्यांच्या कुटुंबियांना झोपेतून उठवले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून प्रियंका व शोभा यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबाडले. रितेश व कुटुंबियांनी आरडाओरडा केला असता त्या तिघांनी उलट्या कोयत्याने रितेश व प्रियंका यांना मारहाण करून जखमी केले.
त्या तिघांनी कारवरही धारदार हत्याराने मारून नुकसान केले. ते तिघे दुचाकीवरून निघून गेल्यानंतर रितेश यांनी आरडाओरडा केला असता तेथे लोक जमा झाले. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास जाण्यास सांगितल्याने रितेश हे कुटुंबासह कोतवाली पोलीस ठाण्यात आले व त्यांनी पोलिसांना माहिती दिली. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.