पुणे । Pune
पुणे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा उग्र चेहरा समोर आला आहे. बिबवेवाडीत दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून, यामध्ये कोयत्याचा वापर करण्यात आला आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रस्त्यावर उभ्या चारचाकी वाहनांजवळ काही तरुणांमध्ये आधी बाचाबाची सुरू झाली. अचानक एका तरुणाने हातातील कोयता काढून दुसऱ्या गटातील व्यक्तीवर सपासप वार केले. या हल्ल्यामुळे एका तरुणाचा शर्ट फाटला, तर दुसरा तरुण रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी दुसऱ्या गटातील आणखी एक तरुण हातात सपाट दगड घेऊन भिरकावतानाही दिसून आला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हाणामारीनंतर दोन्ही गटातील तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला.
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरला. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीविषयी चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः कोयत्याचा उघडपणे वापर होत असल्यामुळे ‘कोयता गँग’चा पुनरुज्जीवन झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे लक्ष वेधत त्वरीत कारवाईची मागणी केली आहे.
https://x.com/RRPSpeaks/status/1918505998366499021
आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, “पुण्यातल्या कोयता गँग चा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते….आणि हा बघा कोयता गँग चा कालचा थरार! पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, ही विनंती!,”