श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
मुंबई येथे नगररचना विभागात अधिकारी असलेले जितेंद्र भोपळे यांच्या श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे असलेल्या वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री सहाजणांच्या कोयता गँगने दरोडा टाकून घरात एकट्या असलेल्या वृध्द महिलेला मारहाण करून व कोयत्याचा धाक दाखवून जवळपास 24 तोळे (23 तोळे 7 ग्रॅम) सोन्याचे दागिने व 60 हजार रूपयांची रक्कम लूटून नेल्याची घटना घडली. जितेंद्र भोपळे यांच्या मातोश्री विजयादेवी लक्ष्मणराव भोपळे (वय 79) यांना दरोडेखोरांनी मारहाण केल्याने त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत तालुका पोलीस ठाण्यात विजयादेवी भोपळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, बंगल्यामध्ये त्या एकट्या राहत असल्याने सर्व दरवाजे लावून 28 मार्च रोजी रात्री झोपल्या होत्या, मात्र झोप येत नसल्याने त्या जाग्या होत्या. रात्री 1 वाजेच्या सुमारास बेडरूमचा दरवाजाची कडी तोडून सहा इसम घरामध्ये आले. त्यांनी हिंदीमध्ये पैसे व दागिन्यांची मागणी केली. व मला शांत रहा असे म्हणून तिघांंनी माझे तोंड दाबून ठेवेले व मला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली, घरातील प्रत्येकी अडीच तोळे वजनाच्या सोन्याच्या 4 बांगड्या (10 तोळे), प्रत्येकी 3 तोळे वजनाच्या सोन्याच्या 2 पाटल्या (6 तोळे), 5 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या (1 तोळा), 5 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व त्यामध्ये 5 ग्रॅमचे पेंडल (साडेपाच तोळे), 2 जोड कानातील सोन्याचे वेल (1तोळा 2 ग्रॅम) अशा प्रकारे एकूण 23 तोळे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम 60 हजार रुपये असा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करत आहे. दरम्यान, भोपळे यांच्या वस्तीवर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्याने रस्त्यापर्यंत मार्ग दाखवला, ठसे तज्ञांचे पथकही त्या ठिकाणी येऊन त्यांनी पंचनामा केला.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वस्तीवरील सर्व ठिकाण तपासली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले. माळवाडगाव वार्ताहराने कळविले की, जितेंद्र भोपळे व धर्मेंद्र भोपळे या बंधुंनी काही वर्षांपूर्वी खानापूर येथे 22 एकर शेती घेतलेली आहे. सुट्टीत सर्व भोपळे बंधू शेतीवर राहावयास असतात. मात्र इतर वेळेस त्यांच्या मातोश्री एकट्या असतात. ही शेती मजुरांमार्फत करून घेतली जाते. सध्या या शेतीवर बाबासाहेब पवार, सुनील पवार गडी आहेत.