नाशिक | प्रतिनिधी | Nashik
रेशनकार्ड असून देखील पात्र रेशनकार्ड (Ration card) धारकांना त्यांचे हक्काचे रेशन मिळत नाही. त्यामुळे सुमारे दोन वर्षांपासून मजुरी करणार्या कुटुंबांवर तसेच विधवा-निराधार-एकल महिलांवर आणि गोरगरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रेशनपासून वंचित असणाऱ्या कुटुंबांना तातडीने रेशन मिळण्याची व्यवस्था करावी. नाही तर दिवाळीच्या फराळाला तहसील कार्यालयात येऊ, असा इशारा क्रांतीज्योती महिला शक्ती क्लबने (Kranti Jyoti Mahila Shakti Club) दिला आहे…
रेशन वितरण व्यवस्थेसंदर्भातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी क्रांतीज्योती महिला शक्ती क्लबच्या महिला कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ (Deputy Collector Rajendra Wagh) तसेच निवासी नायब तहसीलदार सुनीता पाटील यांना निवेदन सादर केले. जर दिवाळीच्या (Diwali) आधी वंचित कुटुंबांना रेशन मिळण्याची व्यवस्था करण्यात आली नाही तर सर्व महिला आपल्या मुलाबाळांसह दिवाळीचा फराळ करायला तहसीलदार कार्यालयात येऊ, असा इशारा क्रांतीज्योती महिला संघटनेच्या संस्थापक विजया दुर्धवळे यांनी यावेळी दिला. या शिष्टमंडळात सुनीता त्र्यंबक निकम, छाया विजय खंडीजोड, मीना काशिदे, इंदुबाई शिरसाठ, लक्ष्मीबाई सोनावणे, गायत्री घोटेकर, सरस्वती निलगार, रुपाली घोटेकर लक्ष्मीबाई राजोळे आदी महिलांचा समावेश होता.
यावेळी सुनीता त्र्यंबक निकम आणि लक्ष्मीबाई सोनवणे या दोन प्रातिनिधिक केसेस जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडण्यात आल्या. सुनीता निकम या ४५ वर्षांच्या निराधार महिला आहेत. लग्नानंतर केवळ ०१ वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले. सहा महिन्यांपूर्वी त्यांचा २४ वर्षांचा एकुलता एक मुलगा मृत्यू (Death) पावला. त्यामुळे त्यांचा आधार हरपला असून आज त्यांना कुठलाही आधार नाही. त्या भाड्याच्या घरात राहतात. मजुरी करून जीवन जगतात. त्यामुळे नियमाप्रमाणे त्यांना पिवळे रेशन कार्ड मिळायला हवे पण त्यांच्याकडे केशरी कार्ड आहे. अत्यंत गरज असतांना देखील मागच्या दोन वर्षात त्यांना धान्य मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना धान्य मिळावे.
तसेच लक्ष्मीबाई संपत सोनवणे यांचे वय ६५ असून त्यांचे पती संपत सोनवणे हे जवळपास ८० वर्षांचे आहेत. घरात तिसरा सदस्य नाही. सुमारे ०६ महिन्यांपूर्वी संपत सोनवणे यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. आज कुटुंबाची सर्व जबाबदारी लक्ष्मीबाई सोनवणे यांच्यावर आहे. त्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे. मात्र, रेशन कार्ड असून देखील त्यांना रेशन मिळत नाही. त्यामुळे त्यांना धान्य मिळावे अशी मागणी या महिलांनी केली.