अकोले |प्रतिनिधी| Akole
आद्य वीर क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची ठेकेदाराकडून विटंबना झाली असल्याचा प्रकार देवगाव येथे उघडकीस आला असून सदर दोन ठेकेदारांविरुद्ध राजुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोले तालुक्यातील क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या देवगाव येथे वीर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक आहे. आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे हे महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असुन ठेकेदाराकडून झालेल्या प्रकाराबद्दल आदिवासी बांधवांच्या भावनेला ठेच पोहचली आहे. देवगाव येथे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या परिसरात सोशोभीकरणाचे काम सुरू होते. त्यावेळी सदर काम करणारे ठेकेदार शैलेश गणपत पांडे, रा.अकोले व कॉन्ट्रॅक्टर अजित बाळू नवले रा. पाडाळणे यांनी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे नुकसान करत त्यांचा पुतळाही बाजूला काढून ठेवला.
सदर प्रकार हा पोपट चौधरी या आदिवासी युवकाच्या लक्षात आला. त्यानंतर देवगाव येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज जमा होण्यास सुरुवात होऊन नंतर हा जमाव राजुर पोलीस स्टेशनला दाखल झाला. या जमावामध्ये आदिवासी समाजाचे युवानेते अमित भांगरे, दिलीप भांगरे, देवगाव च्या सरपंच तुळसाबाई भांगरे, सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे, पंढरीनाथ खाडे यांच्यासह जमलेल्या आदिवासी बांधवांनी सदर प्रकार करणार्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शनिवारी राजुर येथे आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची झालेली विटंबनाबद्दल सर्व आदिवासी समाज एकत्र येणार असून दोषींवर जन्मठेपेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी या आदिवासी बांधवांकडून करण्यात आली आहे .
धामणवन येथील पोपट चौधरी यांच्या फिर्यादीवरून ठेकेदार शैलेश गणपत पांडे, रा.अकोले व कॉन्ट्रॅक्टर अजित बाळू नवले रा. पाडाळणे यांच्या विरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करत असून सदर प्रकाराबाबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी विशेष खबरदारी घेतली.
सदर स्मारकाची झालेली विटंबना ही ठेकेदाराकडून जरी झाली असली तरी शासकीय विभागाकडून आपले हात वर केले गेले आहे . आम्ही सदर ठेकेदाराला स्मारक काढण्याची किंवा स्मारकाचे नुकसान होईल असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून लेखी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.




