अकोले |प्रतिनिधी| Akole
आद्य क्रांतिक्रारक वीर राघोजी भांगरे यांच्या देवगाव (ता.अकोले) येथील पुतळा विटंबना प्रकरणात दाखल केलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा तत्काळ मागे घ्यावा. या मागणीसाठी अकोले बसस्थानक परिसरात सकल मराठा व बहुजन समाजाच्या वतीने शनिवारी (दि.13) निषेध सभा पार पडली. यावेळी कोल्हार-घोटी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शहरात अत्यावश्यक सेवा वगळता पुकारण्यात आलेल्या अकोले बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जर हा गुन्हा मागे घेतला मागे घेतला नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन करावे लागेल, असा इशारा विविध कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.
देवगाव येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. हे काम सुरू असताना पुतळ्याचे विटंबन झाल्याची तक्रार धामणवन येथील पोपट चौधरी या कार्यकर्त्याने राजूर पोलिसांत दिली. याप्रकरणी शैलेंद्र पांडे व अजित नवले या ठेकेदारांविरुद्ध विविध कलमांसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याची भावना बळावली गेली. त्यातच बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पोलिसांना अॅट्रॉसिटी गुन्हा मागे घेण्याबाबत निवेदन देत शनिवारी अकोले बंदची हाक दिली होती. त्यानुसार सकाळपासून शहरात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. बसस्थानक परिसरात घोषणा देत टायर जाळत प्रतीकात्मक निषेध व्यक्त करत सभा घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती कैलास वाकचौरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, उपजिल्हाप्रमुख महेश नवले, ‘अगस्ति’चे संचालक प्रदीप हासे, राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड.वसंत मनकर, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन शेटे, मनसेचे तालुकाप्रमुख दत्ता नवले, संभाजी ब्रिगेडचे नेते डॉ. संदीप कडलग, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष लालू दळवी, काँग्रेस नेते आरिफ तांबोळी, शिवसेनेचे नेते माधव तिटमे, प्रमोद मंडलिक, स्वाती शेणकर, सुरेश नवले आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. संदीप शेणकर, बाळासाहेब सावंत, नामदेव गोर्डे, परशराम शेळके, महेश तिकांडे, सोमनाथ नवले, प्रकाश नाईकवाडी, अनिल कोळपकर, नितीन नाईकवाडी, डॉ. अविनाश कानवडे, भाऊसाहेब नाईकवाडी, एकनाथ यादव, विष्णू कर्णिक, रणजीत शिंदे आदींसह बहुजन समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आम्हालाही आदरस्थानी आहे, ते कोणा एका समाजापुरते मर्यादित नव्हते, त्यांनी सर्वांसाठी, देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांचे जन्मगाव देवगाव येथे स्मारकाचे सुशोभीकरणाचे काम शासनाच्या निधीतून सुरु आहे. ते काम करताना पुतळा काढणे गरजेचा होता. त्यामुळे ठेकेदाराने पुतळ्याचा अवमान होऊ नये म्हणून काढून ठेवला त्यात कुठलीही विटंबना झाल्याचे वाटत नाही. तरी काही राजकारण करणार्या आदिवासी नेत्यांनी त्यात विटंबना झाल्याची भूमिका घेत बहुजन समाजातील सुशिक्षित अभियंता, ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदाराकडून थोडे चुकलेही असेल असे समजू, मात्र त्या बदल्यात त्यांच्यावर थेट अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल करणे हे चुकीचे आहे.
ते काम शासनाचे आहे. त्या कामासाठी शासनामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी कार्यारंभ आदेश दिलेला आहे. मग त्यात ते अधिकारीही दोषी आहेत. त्यांच्यावर पहिले गुन्हे दाखल झाले पाहिजे. घडलेली घटना जाणून-बुजून अथवा हेतूपुरस्कर केलेली नाही. या घटनेत विटंबना झाल्याचे वाटत नाही. केवळ राजकीय नेत्यांच्या श्रेयवादातून बहुजन समाजाच्या तरुणांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रकार कदापि सहन करणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
पुतळा हटविण्यास सांगणार्यांना जनतेसमोर आणा : पिचड
राजूर येथे सन्मान मोर्चानिमित्त कडकडीत बंद
राजूर |वार्ताहर| Rajur
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा ज्यांनी हटविण्यास सांगितले त्यांना जनतेसमोर आणावे व आमच्या दैवतावर व अस्मितेवर ज्यांनी घाला घातला त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी केली. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदेमध्ये पुतळा हटविण्याचे नमूद नसताना तो संबंधित ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता हलविला असल्याने खात्याने गुन्हा दाखल करावा. अन्यथा खात्याला सहआरोपी बनवावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) युवा नेते अमित भांगरे यांनी केली.
तीन दिवसांपूर्वी देवगाव येथील राघोजी भांगरे यांचा पुतळा हटविण्यात आल्याने आदिवासी संघटनांनी संतप्त होऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. यानुसार शनिवारी (दि.13) सकाळी 10 वाजता क्रांतिकारक राघोजी भांगरे सन्मान मोर्चा राजूर पोलीस ठाण्यावर काढण्यात आला. पिचड यांच्या निवासस्थानावरून माजी आमदार पिचड व अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून कोल्हार-घोटी राज्य मार्गावर आंदोलन करण्यात आले. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, संगमनेर, अकोले, राजूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार ते पाच तास रास्ता रोको सुरू होता. आंदोलनकर्त्यांना तहसीलदार, पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी समाधानकारक आश्वासन दिले.
तसेच ज्या ठिकाणी पुतळा होता त्याच ठिकाणी पुन्हा तो पुतळा बसवून द्यावा. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून यात दोषी असणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. तालुक्यात कोणताही जातीयवाद नाही. चुकीचे विधान करून समाजामध्ये गैरसमज पसरवत आहे. त्यांनी खर्याअर्थाने येथे येऊन घटनेचा निषेध नोंदवून मध्यस्ती करणे आवश्यक असताना ते परराज्यात गेले. ज्यांनी तुम्हाला निवडून दिले त्यांना तरी न्याय द्या. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे लक्ष देणे आवश्यक असताना त्यांनी बघ्याची भूमिका घेणे योग्य नाही. तुम्ही गुन्हा दाखल करावा, अन्यथा तुम्हाला सह आरोपी का करू नये, असा सवाल माजी आमदार पिचड यांनी उपस्थित केला.
अमित भांगरे म्हणाले, माजी मंत्री स्व. मधुकर पिचड, माझे वडील अशोक भांगरे यांनी समाजकारण, राजकारण केले. मात्र कधीही जातीय तेढ निर्माण होऊ दिला नाही. तालुक्यात विकासकामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार सुरू आहे. आमचे श्रद्धास्थान असलेल्या क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळल्याला हात घातला असून नवले व पांडे ठेकेदाराने पुतळा काढणाराचे नाव जनतेसमोर आणावे. अन्यथा राज्यात आदिवासी समाजाचे आंदोलन पेटेल, असा इशारा अमित भांगरे यांनी दिला. यावेळी सुनीता भांगरे, दिलीप भांगरे, अनंत घाणे, भरत घाणे, पांडुरंग खाडे, सी. बी. भांगरे, सुरेश भांगरे, गणपत देशमुख, स्वप्नील धांडे, गंगाराम धिंदळे, नामदेव भांगरे, संतोष मुर्तडक, राजेंद्र मधे, सचिन देशमुख, गोपी भांगरे, गोरख परते, पोपट चौधरी, मारुती बांडे, विजय भांगरे, मुरलीधर नाना भांगरे, पंढरीनाथ भांगरे आदींसह मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. संपूर्ण राजूर गाव बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.




