पंचवटी । प्रतिनिधी Panchavati
गोदा आरतीचे भव्य स्वरूपात केलेले आयोजन बघून कुंभमेळा आता होत असल्यासारखे वाटते. आरतीत महिलांच्या सहभाग व भारतीय संस्कृती महान आहे, ती टिकवून ठेवण्यासाठी राजाश्रची गरज आहे. सनातन धर्म हा श्रेष्ठ धर्म टिकवून ठेवण्यासाठी परिश्रम घेतल्याने टिकून आहे, असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांनी केले.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे करण्यात आलेले गोदा आरतीस आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांची प्रमुख उपस्थिती होती. आरतीप्रसंगी मार्गदर्शन करताना गुरुदेव म्हणाले, प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणात भरलेल्या महाकुंभाची व्यवस्था बघून सर्व दुनिया आश्चर्यचकित होत आहे. प्रभूच्या श्रद्धेमुळे शक्य होत आहे. आरती ही श्रद्धा व संत ज्ञानाची करा, पर्यावरणाचे संरक्षण करा. नदीचा प्रवाह शुद्ध ठेवणे हे आपले कर्तृत्व आहे, प्रत्येक व्यक्तीने पाच वृक्ष लावले पाहिजे, जल, मंत्र आणि प्राणायामाने याने शुद्धीकरण होते. चिंतामुक्त व्हा, असे सांगितले.
गुरुदेवांचे आगमन झाल्यानंतर महिलांनी गुरुदेवांचे औक्षण केले, समितीतर्फे गुरुदेवांचा सत्कार करून त्यांना अभिवादन पत्र प्रदान करण्यात आले. समस्त राष्ट्राच्या कल्याणाची प्रार्थना करण्यात आली. गोदावरीचे ध्यान व पूजन करण्यात आले. त्यानंतर जय देवी सूरसरिते गोदावरी माता हे आरतीचे सूर गुंजले.
महाआरतीच्या अगोदर झालेल्या सत्संगात अंबे जगदंबे, जगदंबे जय अंबे, भोले की जय जय, शिवजी की जय जय पार्वती पती शिवजी की जय जय, जय शिवशंकर हर हर शंकर आदी भजन सादर झाली. गुरुदेवांच्या हस्ते रामतीर्थ सेवा समितीच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.