Saturday, May 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उद्योग क्षेत्राचा पुढाकार; कुंभ उद्योग संगममध्ये रु. ३५ कोटींहून अधिक...

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उद्योग क्षेत्राचा पुढाकार; कुंभ उद्योग संगममध्ये रु. ३५ कोटींहून अधिक सामाजिक दायित्व करार

नाशिक | जिमाका वृत्तसंस्था Nashik

- Advertisement -

सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आयोजित कुंभ उद्योग संगम आणि जिल्हा गुंतवणूक परिषदेत उद्योग क्षेत्राने सामाजिक दायित्व निधीतून मोठा पुढाकार घेतला आहे. सार्वजनिक सुविधा, भाविकांसाठी मूलभूत सोयी, शहर सुशोभीकरण आणि सामाजिक विकासाशी संबंधित विविध कामांसाठी रु. ३५ कोटींहून अधिक रकमेचे सामंजस्य करार नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासोबत करण्यात आले.

सिंहस्थ काळात येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या दृष्टीने पाणी व्यवस्थापन, स्वच्छता, दिशादर्शक व्यवस्था, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि स्थानिक रोजगार निर्मिती यांवर या करारांद्वारे विशेष भर देण्यात आला आहे.

यामध्ये सर्वांत मोठा करार व्हीईएल आणि विश्वराज फाउंडेशनकडून करण्यात आला. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड परिसरात स्नानासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी रु. २८ कोटींची शाश्वत जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. पुढील २५ वर्षे या प्रकल्पाचे संचालन आणि देखभाल केली जाणार असून सिंहस्थ काळातील पाणी गुणवत्ता सुधारण्यास याचा मोठा फायदा होणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून रु. ४ कोटींच्या निधीतून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात दिशादर्शक आणि माहिती फलक उभारले जाणार आहेत. यात भाविकांसाठी मार्गदर्शक, सुरक्षाविषयक आणि माहितीपर फलकांचा समावेश असेल.

अशोका बिल्डकॉनकडून शहरातील तीन ठिकाणी रस्ते दुभाजकांचे सुशोभीकरण आणि पुढील दहा वर्षे देखभालीसाठी सुमारे रु. १ कोटींचा करार करण्यात आला आहे. सीटीआर संस्थेकडून नाशिक रोड परिसरातील संत ज्ञानेश्वर नगर येथे ई-ग्रंथालय उभारण्यासाठी रु. १ कोटींची मदत दिली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि युवकांना डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहेत.

याशिवाय रामबंधू मसाले, डीजी समूह आणि एसएमबीटी संस्थांकडून स्वच्छता, वाहतूक सुविधा, रस्ते, प्रकाश व्यवस्था, उद्यान सुशोभीकरण आणि इतर सार्वजनिक सुविधांसाठी सहकार्य जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘देआसरा’ संस्थेसोबतही महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील दोन हजार सूक्ष्म उद्योजकांना सिंहस्थ २०२७च्या आर्थिक संधींशी जोडले जाणार आहे. त्यांना व्यवसाय नोंदणी, बाजारपेठ उपलब्धता, कर्ज सुलभता आणि व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार असून सिंहस्थातून निर्माण होणाऱ्या अर्थचक्रात स्थानिक छोट्या उद्योजकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “कुंभ उद्योग संगममध्ये झालेली सामाजिक दायित्व भागीदारी ही उद्योग क्षेत्र आणि प्रशासन यांच्यातील सकारात्मक समन्वयाचे उदाहरण आहे. सिंहस्थ २०२७साठी उभारली जाणारी ही कामे भविष्यातही नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारी दीर्घकालीन सार्वजनिक मालमत्ता निर्माण करतील.”

ताज्या बातम्या