पुणे | प्रतिनिधी | Pune
पुणे जिल्ह्यातील (Pune District) मावळ तालुक्यात (Maval Taluka) इंद्रायणी नदीवरील रांजणखळगे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी (Tourist) रविवारचा दिवस घातवार ठरला. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या तळेगाव दाभाडे परिसरातील कुंडमळा (Kundmala) येथील इंद्रायणीवरील लोखंडी पूल क्षमतेपेक्षा अधिक भाराने कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. १८ जण गंभीर जखमी झाले. ३८ जणांना वाचवण्यात एनडीएआरएफच्या पथकाला यश आले.
या आपत्तीत अनेक जण नदीच्या (River) प्रवाहासोबत वाहन गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तातडीने सर्व शासकीय यंत्रणा घटनास्थळी रवाना केल्या. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई (Action) करण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.
दरवर्षी पावसाळयात (Rain) पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारो नागरिक तळेगाव येथील कुंडमळा येथे भेट देतात. दररोज प्रमाणेच रविवारीही (दि.१५) शेकडो नागरिक कुंडमळा येथे पर्यटनासाठी आले होते. गेले काही दिवस सातत्याने पाऊस होत असल्याने इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. शेलारवाडी ते कुंडमळा या दोन गावांना जोडणारा एक पूल आहे. हा पूल किमान ४० ते ५० वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येते. पूर्वी हा पूल संपूर्णपणे लोखंडी ढाच्याचा होता.
गेल्या काही वर्षात पुलाच्या दोन्ही बाजूच्या काही भागाचे सिमेंट बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, पुलाचा मध्यभाग हा लोखंडीच होता. पर्यटनाला आलेल्या काही नागरिकांनी आपल्या दुचाकी या पुलावर घातल्या. तर काही पर्यटक पुलाबर उभे होते. क्षमतेपेक्षा अधिक भार झाल्याने अचानक पुलाचा मोठा आवाज झाला आणि हा लोखंडी पूल कोसळला. पूल कोसळल्यानंतर पुलावरील सर्व पर्यटक आणि त्यांच्या दुचाकी नदीच्या प्रवाहात पडले. काही पर्यटक लोखंडी पुलाच्या साच्याखाली अडकले. त्यामुळे त्यांचा जागीच पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर काही पर्यटक पुराच्या पाण्यासोबत वाहून गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
शासकीय यंत्रणेकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अंदाजे १०० पर्यटक या पुलावर (Bridge) होते. या दुर्घटनेमधून एकूण ३८ व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी १८ व्यक्ती जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील १) पवना रुग्णालय, २) मायमर हॉस्पिटल, ३) अथर्व हॉस्पिटल आदी रुग्णालयांत उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान ४ व्यक्तींचा मृत्यू झाला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची २ पथक, आपदा मित्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, लोणावळय़ातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक व स्थानिक मदत बचाव संस्था इत्यादी घटनास्थळी दाखल झाल्या असून, मदतकार्य सुरू आहे.
पुलाचा सांगाडा उचलण्याचे आव्हान
या दुर्घटनेत लोखंडी पुलाचा संपूर्ण सांगाडा नदीत कोसळला. पुलावर दुचाकी तसेच चालत असणारे अनेक पर्यटक नदीत कोसळले. काही पर्यटक या पुलाच्या सांगडयाखाली अडकल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर प्रशासनाने चार मोठ्या पेन बोलावून सांगाडा काढण्याचा प्रयत्न चालवला. मात्र, नदीचे पाणी, पात्रातील खडक आणि जोरदार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते.
नातेवाईकांचा आक्रोश….
कुंडमळा येथे वर्षा सहलीसाठी अनेक पर्यटक सहकुटुंब आले होते. यातील अनेक नागरिक आपली पत्नी, मुलांना चांगला निसर्ग दाखविण्यासाठी दुचाकीवर घेऊन नदीच्या पुलावर गेले. त्यावेळी त्यांचे नातेवाईक फोटो काढत होते. त्यातच अचानक पूल कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. पूल कोसळल्याचे पाहताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. माझा मुलगा, सून, नातू पुलावर होते. ते खाली पडले आहेत. अजून सापडले नाहीत, त्यांना बाचवा, त्यांना शोधा, अशी आर्त हाक नातेवाईक देत होते.
अनेक नेत्यांची घटनास्थळी धाव
या दुर्घटनेची माहिती समजताच मदत व पुनर्वसनमंत्री गिरीश महाजन, मावळ तालुक्मयाचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे नेते रवींद्र भेगडे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, रघुवीर शेलार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल घेतली व मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले. दुर्घटना घडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक व परिसरातील नागरिकदेखील दाखल झाले. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. परिणामी मदत कार्यास काहीसा अडथळा निर्माण होत होता. त्यातच पावसाच्या सरीही सुरू होत्या. त्यानंतर अंधारही पडला. मात्र, बचाव कार्य सुरूच ठेवण्यात आले होते.





