मुंबई | Mumbai
मुंबईतील कुर्ला येथे काल रात्री खूप मोठा अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ४२ जण जखमी झाले आहेत. मुंबई दुर्घटनेच्या कारणाचा तपास सुरू असून संजय मोरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आरोपीचा किंवा इतर कोणाचा काही कट अथवा छडयंत्र होते का याचा तपास करायचा असल्याचे सांगत आरोपीची ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. आरोपीच्या वकिलांनी त्यावर युक्तिवाद करत विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर कोर्टाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सोमवारी रात्री ९.३० वाजे दरम्यान, बेस्टची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे मार्ग क्रमांक ३३२ वरून जात असल्याचे सांगण्यात आले. या बेस्ट बसेस बृहन्मुंबई महानगरपालिका चालवतात. एल वॉर्ड कार्यालयाजवळील व्हाईट हाऊस इमारतीजवळ बसचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगात आलेल्या बसने अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात पाच-सहा ऑटोरिक्षा, १० मोटारसायकल आणि सुमारे १० पादचाऱ्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू तर ४८ जण जखमी झाले.
दरम्यान, आरोपी संजय मोरे याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी सुरु केली असून या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर मोरेने धक्कादायक खुलासा केला आहे. ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सवय नसल्याने गोंधळल्याचे संजय मोरे यांनी पोलीस चौकशीत स्पष्ट केले आहे. क्लच नसलेल्या गाड्या चालवणे गैरसोईचे असल्याचा संजय मोरेंनी पोलिसांना जबाब दिला. गाडी चालवताना क्लच समजून एक्सिलेटर दाबल्याचे बसचालक संजय मोरे याने सांगितले. ४३ वर्षीय चालकाला अनुभव असला तरी त्याने आधी कधी ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती. १ डिसेंबरला पहिल्यांदाच त्याने ऑटोमॅटिक बस चालवली. बसच्या तपासणीत बसचे ब्रेक्स काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१ तारखेला ड्युटीवर रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच ऑटोमॅटिक बस चालवली, असेही त्याने कबूल केले. त्यामुळे पुरेसा अनुभव असताना एखाद्या ड्रायव्हरला एवढी मोठी बस चालवण्यास कशी दिली, प्रवाशांचा जीव धोक्यात कसा घातला, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत.