श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील वडाळा महादेव (Wadala Mahadev) येथे कुट्टी करत असताना कुट्टी मशीनमध्ये हात गेल्याने वैभव सुरेश पवार या 39 वर्षीय तरुण शेतकर्याचा अपघाती मृत्यू (Youth Farmer Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वडाळा महादेव येथील तरुण शेतकरी वैभव सुरेश पवार यांची पवार वस्तीजवळ शेती व जनावरांचा गोठा आहे. सोमवारी 19 मे सायंकाळी जनावरांना चार्यासाठी कुट्टी काढण्याचे (Kutti Machine) काम सुरू असताना, नजर चुकीने वैभव पवार याचा हात मशीनमध्ये अडकला. मशिन सुरू असल्यामुळे त्याचा हात ओढल्या गेल्याने छातीला जबर मार लागला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
हात काढण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले तसेच मदतीसाठी आसपास कुणीही नसल्याने त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. शिवम पवार हा तेथून जात असताना त्याच्या हा प्रकार लक्षात आला, त्याने नातेवाईकांना आवाज दिला, मशीनमधून वैभवची सुटका करून त्याला उपचारासाठी लोणी येथे हलविले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वैभव हा एक होतकरू तरुण शेतकरी होता. शेतीची त्याला विशेष आवड होती. अनेक नवीन प्रयोग त्याने शेतात राबविले. परिसरातील अनेक शेतकर्यांना शेतीकामात त्याने मदत केली. गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात तो अग्रभागी असायचा. त्याचे पश्चात वडील, पत्नी, बहिण, दोन मुले असा परिवार आहे.